तबलावादक अनिंदो चटर्जी यांनी पद्मश्री पुरस्कार नाकारला !

विलंबाने पुरस्कार मिळत असल्याचा आरोप

मान्यवरांचा योग्य वेळी सन्मान केला नाही, तर तो अपमानच ठरतो, असेच काहीसे पद्म पुरस्करांविषयी देशात गेल्या अनेक दशके चालू असल्याने अनेकांनी हा पुरस्कार नाकारला आहे. याविषयी अधिक संवेदनशील होण्याची आवश्यकता आहे ! – संपादक

प्रसिद्ध तबलावादक पंडित अनिंदो चॅटर्जी

नवी देहली – प्रसिद्ध तबलावादक पंडित अनिंदो चॅटर्जी यांनी त्यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. पंडित अनिंदो चॅटर्जी म्हणाले की, मला २५ जानेवारीला देहलीतून पुरस्कार स्वीकारण्याविषयीच्या संमतीसाठी दूरभाष आला; मात्र मी विनम्रपणे हा पुरस्कार नाकारला आहे. मी या पुरस्कारासाठी ‘धन्यवाद’ म्हटले; मात्र माझ्या व्यवसायाच्या या टप्प्यावर मी हा पुरस्कार स्वीकारण्यास सिद्ध नसल्याचे कळवले. हा पुरस्कार स्वीकारण्याचा टप्पा मी पार केला आहे. मला १० वर्षांपूर्वी हा पुरस्कार मिळाला असता, तर मी आनंदाने स्वीकारला असता. माझ्यासमवेतचे आणि अगदी माझ्या कनिष्ठांनादेखील खूप वर्षांपूर्वीच हा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळेच मी क्षमा मागत हा पुरस्कार स्वीकारू शकत नाही, असे नम्रपणे कळवले आहे.

९० वर्षीय प्रसिद्ध गायिका संध्या मुखर्जी यांनीही पुरस्कार नाकारला !

प्रसिद्ध गायिका संध्या मुखर्जी

प्रसिद्ध गायिका संध्या मुखर्जी यांच्याकडूनही पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यास नकार देण्यात आला आहे. संध्या मुखर्जी यांची मुलगी म्हणाले की, जवळपास ८ दशके श्रोत्यांना मंत्रमुग्ध केल्यानंतर वयाच्या ९० व्या वर्षी त्यांना यापेक्षा मोठा सन्मान मिळायला हवा.

बंगालमधून एकूण ३ व्यक्तींनी पद्म पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला. चॅटर्जी आणि मुखर्जी यांच्या आधी बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि माकपचे नेते बुद्धादेब भट्टाचार्य यांनी पद्मभूषण पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला होता.