कोल्हापूर, २६ जानेवारी (वार्ता.) – छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असून येथे कोरोनाबाधित, तसेच अन्य रुग्णांवरही उपचार होणार आहेत. त्यासाठी ५५० खाटांसह नव्या तांत्रिक सुविधा उपलब्ध आहेत. प्राणवायू, ‘व्हेंटिलेटर’, बालरोग उपचारांपासून ते महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील सुविधांचा लाभ देण्याचे नियोजन रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे, अशी माहिती छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित यांनी पत्रकारांना दिली.
डॉ. दीक्षित पुढे म्हणाले, ‘‘लसीकरणामुळे कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण अल्प आहे. ५ ते ७ टक्के रुग्णांना रुग्णालयात भरती करून घेण्याची आवश्यकता आहे. दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतंत्र नोंदणी कक्ष आहे. त्यामळे आठवडाभरात १ सहस्र २०० दाखले देण्यात आले आहेत. याशिवाय ‘इंटरनेट कॉलिंग सिस्टीम’, गरम पाण्यासाठी सौरऊर्जा व्यवस्था, यांसह अन्य सुविधा लवकरच रुग्णालयात चालू करण्यात येणार आहेत.’’