भाजपचे आमदार नितेश राणे यांची पोलिसांकडून चौकशी

शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील आक्रमणाचे प्रकरण

आमदार नितेश राणे कणकवली पोलीस ठाण्यात उपस्थित

सिंधुदुर्ग – शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक आक्रमणाच्या प्रकरणी गुन्हा नोंद असलेले भाजपचे आमदार नितेश राणे २४ जानेवारी या दिवशी कणकवली पोलीस ठाण्यात उपस्थित होते. या वेळी पोलिसांनी आमदार राणे यांची दीड घंटा चौकशी केल्याचे समजते.

परब यांच्यावरील आक्रमणाच्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी राणे यांनी प्रथम जिल्हा न्यायालयात आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयात अर्ज प्रविष्ट केला होता. या दोन्ही ठिकाणी राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. जामीन अर्ज फेटाळतांना उच्च न्यायालयाने ‘नितेश राणे यांना २७ जानेवारीपर्यंत अटक करू नये’, असा आदेश दिला. त्यानंतर राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज प्रविष्ट केला आहे. या प्रकरणातील सहआरोपी तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उपाख्य गोट्या सावंत यांचाही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे, तर अन्य आरोपी तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष मनीष दळवी यांना उच्च न्यायालयाने जामीन संमत केला आहे.