मुंबई – महाविकास आघाडी सरकारने शिवसेनेचे ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांना वैयक्तिक लाभ करून देतांना मंत्रिपदाच्या शपथेचा भंग केला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ बरखास्त करून संबंधित मंत्र्यांवर गुन्हे नोंद करावेत, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे २२ जानेवारी या दिवशी केली.
सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामावरील दंड आणि व्याज मंत्रिमंडळाने माफ करून त्यांना वैयक्तिक लाभ करून दिल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. याला वित्त विभागाचा विरोध होता, असे ते म्हणाले. या प्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सरनाईक यांनी ठाण्यातील पोखरण रोड क्र. १ येथे उभारलेल्या ‘छाबय्या विहंग गार्डन’ या गृहसंकुलात अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप भाजपने केला आहे. या प्रकरणी ठाणे महापालिकेने त्यांना दंड ठोठावला आहे. अनधिकृत बांधकामाविषयीचा आरोप प्रताप सरनाईक यांनी फेटाळून लावला आहे.