‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या समाजात दुही निर्माण करणार्‍या चित्रपटावर बंदी घाला ! – महाराष्ट्र करणी सेनेची मागणी

महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख श्री. अजयसिंह सेंगर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन सादर केले निवेदन !

  • समाजात दुही निर्माण करणार्‍या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी का करावी लागते ? सरकार स्वतःहून कारवाई का करत नाही ? – संपादक

  • समाजात दुही निर्माण करणार्‍या चित्रपटांवर बंदी घालण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक

मुंबई – ‘समाजात जातीय दुही निर्माण करणार्‍या ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या चित्रपटावर बंदी घालावी’, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख श्री. अजयसिंह सेंगर यांनी शिष्टमंडळासह गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन दिले. ‘या चित्रपटामुळे राज्यातील शांतता आणि कायदा सुव्यवस्था बिघडू शकते’, अशी शक्यता श्री. सेंगर यांनी निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की,

१. या चित्रपटाच्या ‘ट्रेलर’मधून (चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी प्रदर्शित केल्या जाणार्‍या त्यातील काही प्रसंगांतील क्षणांच्या अत्यल्प वेळेच्या विज्ञापनातून) खोटा जातीयवाद दर्शवून मागासवर्गीय जनतेला हिंदु धर्माविरुद्ध प्रक्षोभक दाखवण्यात आले आहे. यामुळे महाराष्ट्रात जातीय दंगल घडू शकते.

२. या चित्रपटामध्ये शूरवीर ब्राह्मण आणि लढवय्ये मराठे यांच्या विरोधातही गरळ ओकून त्यांच्या शौर्याचा अपमान करण्यात आला आहे. दलित, बहुजन आणि ब्राह्मण यांच्यात दुही निर्माण होऊन दंगल घडावी, अशा पद्धतीने चित्रपट बनवण्यात आला आहे.

३. ‘कोरेगाव भीमा येथे इंग्रजांसमवेत झालेल्या लढाईत जे भारतीय मृत्यूमुखी पडले, त्यांना श्रद्धांजली वहाण्याचा कार्यक्रम ठेवावा’, अशीही मागणी करण्यात आली.

कोरेगाव भीमा लढाईचा इतिहास

१ जानेवारी १८१८ या दिवशी पेशवे आणि इंग्रज यांच्यात कोरेगाव भीमा येथे लढाई झाली. या वेळी दलित इंग्रजांच्या बाजूने लढले. या लढाईत पेशव्यांचा पराभव झाला आणि इंग्रज विजयी झाले. यानंतर इंग्रजांची भारतावर सत्ता आली. त्यामुळे या लढाईला ऐतिहासिक महत्त्व आहे.