सुशोभिकरणाचे प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हा परिषद अध्यक्षांचे आदेश
सिंधुदुर्ग – जिल्ह्यात अनेक ठिकाणी तलाव, तसेच धरणे आहेत. यातील पर्यटनदृष्ट्या विकसित करता येतील, अशा ठिकाणांची सूची सिद्ध करून त्यांचे सुशोभिकरण करण्यासाठीचे प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे सादर करावेत, असा आदेश जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीने २१ जानेवारी या दिवशी झालेल्या सभेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संजना सावंत यांनी दिला.
ही सभा सौ. संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, सभापती अंकुश जाधव, महेंद्र चव्हाण आदी सदस्य उपस्थित होते.
प्रतिवर्षी पर्यटन विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होत असतो. यातील काही निधी यापुढे जिल्ह्यात असलेली धरणे आणि तलाव यांच्या सुशोभिकरणावर खर्च व्हावा. त्यामुळे पर्यटन व्यवसायालाही चालना मिळेल. यामध्ये सिंधुदुर्गनगरी (ओरोस), कसाल, वालावल, दोडामार्ग आणि मालवण येथील धरणांचा समावेश करून ती विकसित करावीत, अशा सूचनाही उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर आणि समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी केल्या.