लातूर येथे पोलिसांनी जप्त केलेल्या सव्वा कोटी रुपयांच्या गुटख्याची चोरी !

पोलिसांच्या निष्क्रीयतेचे आणि दायित्वशून्य कामाचे उदाहरण ! – संपादक 

लातूर – मागील ३ मासांपूर्वी येथील साहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत कदम यांनी धाड टाकून ६ गोदामांतून सव्वा कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला होता; मात्र जप्त केलेला गुटखा ‘सील’ करून ज्या ठिकाणी ठेवण्यात आला होता, त्या एम्.आय.डी.सी. परिसरातील गोदाम फोडून चोरट्यांनी ४० लाख १५ सहस्र ३२ रुपयांचा गुटखा चोरून नेला आहे. या प्रकरणी २० जानेवारी या दिवशी रात्री एम्.आय.डी.सी. पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद झाला आहे. (पोलिसांनी जप्त केलेल्या वस्तूंचीच चोरी होत असेल, तर सर्वसामान्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने कुणाकडे पहायचे ? असे निष्क्रीय पोलीस जनतेच्या संपत्तीचे रक्षण कधीतरी करू शकतील का ? संबंधित पोलिसांवर कठोर कारवाई होणे आवश्यक ! – संपादक)

१. ऑक्टोबर २०२१ मध्ये कदम यांनी कारवाई करत गोलाई परिसरातील एका किराणा दुकानात कारवाई करत प्रारंभी ११ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला होता. त्यानंतर याच दुकानचालकाच्या मालकीच्या शहरातील अन्य ६ गोदामांत धाडी टाकून कदम यांनी सव्वा कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला होता. या प्रकरणी ३ जणांवर गुन्हाही नोंद करण्यात आला होता.

२. विशेष म्हणजे या मालाची राखण करण्यासाठी पोलीस प्रशासनातील ‘गार्ड’ची ही नियुक्ती करण्यात आली होती; मात्र चोरट्यांनी पोलिसांच्या कह्यात असलेला गुटखा गोदामाचा पत्रा कापून चोरून नेला. (चोरी होतांना सुरक्षारक्षक कुठे होता ? – संपादक)