संभाजीनगर – राज्यातील बहुचर्चित ३०-३० घोटाळ्यांतील मुख्य सूत्रधार असलेला आरोपी संतोष राठोड याच्या विरोधात तक्रारदाराने तक्रार देताच त्याला ग्रामीण पोलिसांनी २१ जानेवारी या दिवशी अटक केली आहे. डी.एम्.आय.सी. समृद्धी महामार्ग, तसेच धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग यांसाठी जिल्ह्यातील बिडकीन, चिकलठाणा, करमाड आणि कन्नड या भागांतील शेतकर्यांच्या भूमी संपादित करण्यात आल्या आहेत. शासनाने या शेतकर्यांना कोट्यवधी रुपयांचा मोबदला दिला आहे. अशा शेतकर्यांना गाठून त्यांच्याकडून सचिन उपाख्य संतोष राठोड याच्यासह त्याच्या साथीदारांनी २५ ते ३० टक्के व्याजाचे आमीष दाखवून पुष्कळ प्रमाणात पैसे गुंतवणूक करायला लावले. गेल्या १ वर्षापासून मोबदला देणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे सहस्रो शेतकर्यांचे पैसे या ३०-३० घोटाळ्यांमध्ये अडकले आहेत.