व्यक्तीस्वातंत्र्याची सोयीस्कर भूमिका घेणारे शरद पवार ! – संपादक
मुंबई, २१ जानेवारी (वार्ता.) – ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात नथुरामची भूमिका करणार्या डॉ. अमोल कोल्हे यांच्या भूमिकेकडे कलाकार म्हणून पाहिले पाहिजे. ‘रामराज्य’ चित्रपट असेल, तर त्यात रावणाची भूमिका करणारा व्यक्ती रावण असू शकत नाही. सीतेचे रावणाने अपहरण केले म्हणजे त्या कलाकाराने अपहरण केले असे होत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चित्रपटावरील औरंजेबाची भूमिका जो करतो, तो मोगलांचा समर्थक होतो, असे नाही.
(सौजन्य : ABP MAJHA)
डॉ. अमोल कोल्हे आमच्या पक्षात नवीन आहेत. कलावंत म्हणून त्यांनी भूमिका केली असेल, तर गांधीविरोधी आहेत, असा त्याचा अर्थ होत नाही. नथुरामचे महत्त्व वाढवायचा प्रयत्न नाही. कलावंत म्हणून मी कलावंताचा सन्मान करतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी, डॉ. अमोल कोल्हे यांनी चित्रपटात नथुरामची भूमिका साकारल्याविषयी व्यक्त केली. (हीच भूमिका अभिनेते शरद पोंक्षे हे जेव्हा नाटकात साकारत होते, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याला का विरोध करत होता ? इतकेच काय तर नाटक बंद पाडण्याचे, धमक्या देण्याचेही प्रयत्न झाले ? या सर्व गोष्टींकडे जनतेने कसे पहायचे ? – संपादक)