मुंबई – विशेष न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आर्थिक घोटाळ्याच्या (मनी लाँड्रिंग) प्रकरणातील जामीन अर्ज फेटाळला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अनिल देशमुख यांना २ नोव्हेंबर २०२१ या दिवशी अटक केली होती. ‘अनिल देशमुख हेच सचिन वाझे यांनी डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत बार मालकांकडून वसूल केलेल्या खंडणीचे मुख्य लाभार्थी आहेत’, असा आरोप ईडीने केला आहे.
अनिल देशमुख यांच्या अधिवक्त्यांनी देशमुख यांची न्यायालयीन कोठडी ६० दिवसांपेक्षा अधिक काळ वाढवण्यात आल्याचा आणि ईडी न्यायालयाची दिशाभूल करत असल्याचा युक्तीवाद केला. ईडीने अनिल देशमुख यांच्या विरोधात २९ डिसेंबर २०२१ या दिवशी पुरवणी आरोपपत्र प्रविष्ट केले. निश्चित वेळेआधी आरोपपत्र प्रविष्ट झाल्यास आरोपीला जामीन (डिफॉल्ट बेल) मागता येत नाही, असा युक्तीवाद ईडीकडून करण्यात आला. ईडीने अनिल देशमुख यांच्या जामिनाला विरोध केला.