स्वत:चा भ्रष्टाचार आणि दडपशाही लपवण्यासाठी काँग्रेसने केलेला आटापिटा

जयप्रकाश नारायण यांच्यावरील दूरदर्शन निर्मित ‘लोकनायक’

म. गांधी, विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण हे सत्तेपासून दूर राहिले; परंतु भारतीय राजकारण अन् समाजकारण यांवर त्यांच्या विचारकार्याने अमीट असा प्रभाव टाकला आहे. त्यांच्या हयातीत स्वत:च्या शब्दांनी सत्ताधिशाला झुकण्याची शक्ती होती. हा दरारा त्यांच्या पश्चातही कायम आहे; म्हणूनच सत्ताधीश सोयीने का होईना; पण गांधी-विनोबा-जयप्रकाश यांना स्वीकारतात.

तथापि सत्तापालटात एकाची सोय ही दुसर्‍याची गैरसोय होते. जयप्रकाश नारायण यांच्यावरील दूरदर्शननिर्मित ‘लोकनायक’ टेलिफिल्मच्या संदर्भात असेच झाले. ही टेलिफिल्म बनवण्याचे उत्तरदायित्व दूरदर्शनवर सोपवण्यात आले, तेव्हा देशात भाजप आघाडीची राजवट होती. वर्ष २००४ मध्ये काँग्रेस आघाडीचे सरकार आले. ही टेलिफिल्म सलग ३ दिवस ३ भागांत ‘दूरदर्शन’वर प्रदर्शित होणार होती; परंतु या प्रदर्शनात १३ जागी कात्री लावल्याचे ऐकायला मिळाले. ही आजच्या आणि कालच्या काँग्रेस सत्तेची करामत आहे. आणीबाणीच्या पूर्वी आणि नंतर जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेस सत्ताधार्‍यांचा भ्रष्टाचार अन् दडपशाही यांची पोलखोल करून सामाजिक-राजकीय उठाव घडवून आणला होता. त्याचे चित्रीकरण त्या १३ ‘कट’मध्ये आहे. ‘एवढ्यासाठीच तत्कालीन मनमोहन सिंह सरकारने कात्री चालवली आहे’, असे नाही. त्यासमवेत इंदिरा गांधींच्या सत्तेविरोधात संपूर्ण क्रांतीचा नारा देतांना जयप्रकाशजी यांनी रा.स्व. संघ परिवाराची साथ घेतली होती. या साथीदारीविषयी जयप्रकाश यांनी संघ परिवाराचे गौरवपूर्ण शब्दांत कौतुक केले होते. त्याचाही त्या १३ ‘कट’मध्ये समावेश आहे.

सत्तेचा अपलाभ घेऊन केलेली दडपशाही इतिहासाच्या पुनरावृत्तीचे कारण

जयप्रकाशजींचा इंदिरा गांधी यांच्या सत्तेविरोधातील उठाव, आणीबाणीवरील टीका आणि संघ परिवाराचे कौतुक भाजपच्या लाभाचे आहे; म्हणून ते काढणे, हा राजकारणाचा भाग झाला; पण त्यामुळे ‘टेलिफिल्म’ अर्थहीन होईल, तसेच ते लोकशाहीचा मूळ अधिकार असलेले विचारस्वातंत्र्य चिरणारे ठरील, याचे भान काँग्रेस आघाडी सरकारने ठेवले पाहिजे. इतिहास दडपल्याने इतिहासाची पुनरावृत्ती टळत नाही. किंबहुना सत्तेची मस्ती दाखवणारी ही दडपशाहीच इतिहासाच्या पुनरावृत्तीचे कारण ठरते. या टेलिफिल्मचे सर्व हक्क दूरदर्शनकडे असल्याने ती इतरत्र प्रदर्शित होणे शक्य नाही. त्यामुळे विनाकट जयप्रकाशजींची ‘टेलिफिल्म’ पहाण्याची इच्छा असणार्‍यांनी सत्ता पालटण्याची वाट पहावी लागेल.

(साभार : चित्रलेखा, ६.१२.२००४ )