अपहरणकर्ता चीन !

संपादकीय

‘भारतीय जनतेचे अपहरण करणे’ यालाही कायदेशीर स्वरूप द्यायला चीन कमी करणार नाही !

चीन आणि पाकिस्तान यांच्या एक एक नवीन आक्रमक चाली पहात रहायच्या आणि त्यांना तेवढ्यापुरते शाब्दिक किंवा क्वचित् सैन्य स्तरावर प्रत्युत्तर देत रहायचे, हीच मालिका गेली काही वर्षे भारतीय जनता अनुभवत आहे. याचा आणखी एक पुढच्या टप्प्याचा अनुभव अरुणाचल प्रदेशमधील सियांग जिल्ह्यातील दोन तरुणांच्या चिनी सैन्याने केलेल्या अपहरणाने आला आहे.

चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मी (पी.एल्.ए.)ने अरुणाचल प्रदेशमधील शिकारी असलेल्या २ युवकांचे अपहरण केले. त्यांपैकी एक त्यांच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी झाल्यावर त्याने व्हिडिओद्वारे तेथील भाजपचे खासदार तापिर गाओ यांना त्याच्या मित्राला सोडवण्याचे आवाहन केले. खासदार गाओ आणि काँग्रेसचे आमदार निनॉग्न एरिंग यांनी या मुलाला सोडवण्याविषयी केंद्राला कळवले. तत्पूर्वी स्थानिक पोलिसांनी स्थानिक सैन्याला याविषयी सांगितल्यावर त्याला सोडवण्याचे प्रयत्न चालू झाले आहेत आणि सैन्य त्यात यशस्वीही होईल; परंतु या अतिक्रमणासाठी कुणाला उत्तरदायी धरायचे ? यापूर्वी कॅप्टन अभिनंदन यांना सोडवतांना भारताने बाका प्रसंग आलाच, तर त्याला तोंड देण्यासाठी तिन्ही सैन्य दले सज्ज ठेवली होती; पण हा सामान्य युवक आहे. यातील सुटून आलेला मिराम नावाचा युवक त्यांच्या तावडीतून सुटला; म्हणून ही गोष्ट बाहेर तरी आली. ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावरील ‘लुंगता जोर’ या प्रदेशातून या युवकांचे अपहरण करण्यात आले. वर्ष २०१८ मध्येच चीनने येथे रस्ते बनवले आहेत. भारतीय युवकांचे अपहरण होण्याची ही दुसरी वेळ आहे. २ वर्षांपूर्वीही औषधी वनस्पती शोधणार्‍या ५ जणांना कह्यात घेण्यात आले होते.

स्वयंघोषित कायदे बनवून भारतावर अतिक्रमण !

भारताची एकंदर ३ सहस्र ४०० कि.मी. लांब सीमा चीनशी जोडलेली आहे, त्यांपैकी अरुणाचल प्रदेशची सीमा १ सहस्र ८० कि.मी. आहे. या विस्तृत सीमेवरून विविध कारस्थाने करून भारतात घुसण्याचा प्रयत्न चीन अनेक दशके सतत करत आहे आणि भारताची ऊर्जा ते प्रयत्न हाणून पाडण्यात व्यय होत आहे. आतापर्यंत चीनने अरुणाचल प्रदेशमधील ९० सहस्र कि.मी. एवढ्या मोठ्या भागावर त्याचा दावा केला आहे. या सर्व अनधिकृत गोष्टींना अधिकृत रूप देण्यासाठी चीनने ‘लँड बॉर्डर’ नावाचा कायदा बनवला आहे. चीनच्या दृष्टीने तो त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी असून यात सीमेशी संबंधित ६२ सूत्रांचा समावेश त्याने केला आहे. भारतावर कुरघोडी करणार्‍या विविध गोष्टींना त्यांच्या देशाच्या दृष्टीने कायदेशीर रूप देणारा हा कायदा अर्थात्च भारताच्या दृष्टीने महाघातक आहे. भारतीय तज्ञांच्या मतानुसार कायद्याच्या एका तरतुदीच्या नावाखाली वर्ष २०२० मध्ये चीनने वास्तविक नियंत्रण रेखा (एल्.ओ.सी.) उल्लंघन केल्याच्या घटनेला एक गोंडस आणि कायदेशीर स्वरूप देण्याचा कुटील हेतू त्याने साध्य करून घेतला आहे. वर्ष २०२० मध्ये ही नियंत्रणरेषा ओलांडून चीनने वसवलेल्या वसाहतीपेक्षा वर्ष २०२१ मध्ये बनवलेल्या नवीन ६० इमारती या १०० कि.मी. अधिक पुढे आहेत. भारतातील हे सर्व अनधिकृत बांधकाम आता चीनसाठी ‘कायदेशीर’ होणार आहे. याच कायद्यातील अन्य एका तरतुदीच्या आधारे डिसेंबर २०२१ मध्ये अरुणाचल प्रदेशमधील भागांची नावे पालटल्याचे तो स्वतःच घोषित करत आहे. ‘एखादा प्रदेश प्रत्यक्ष भारताच्या कह्यात असतांना त्याला स्वतःचे नाव देणे’ आणि त्या माध्यमातून ‘तो त्याचा झाला आहे’, असे भासवणे अन् नंतर त्यावर ‘अधिकार सांगणे’, हे चीनचे धोरण या कायद्यामुळे ‘अधिकृत’ होणार आहे. या प्रकरणी ‘खोट्या दाव्यांनी सत्य पालटत नाही’, असे म्हणून भारताने त्याला खडसावले खरे; त्यामुळे त्याला काही फरक पडला नाही. त्याचेच प्रत्यंतर या दोन मुलांचे अपहरण करण्याच्या उदाहरणातून आले. नावे पालटलेला हा परिसर थोडाथोडका नसून ११ जिल्ह्यांतील ४ शहरे, ४ पहाड, २ नद्या आणि पहाडाचा परिसर एवढा मोठा आहे. नावे पालटल्यावर लगेचच चीनने देशाचे विविध नकाशे प्रसिद्ध केले. हे सांगण्याचे कारण म्हणजे गावे वसवणे, रस्ते बनवणे, भागांची नावे पालटणे यानंतर आता ‘भारतीय जनतेचे अपहरण करणे’ चीनने चालू केले आहे. उद्या चीन यालाही कायद्याचे स्वरूप देईल आणि ‘ग्लोबल टाइम्स’मध्ये ‘ते कसे कायदेशीर आहे’, हे छापेल !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

उद्दाम राहुल गांधी

प्रसिद्धीलोलुप आणि उद्दाम काँग्रेसी राहुल गांधी यांनी मुद्दामहून ट्वीट करून ‘या युवकांच्या पाठीशी असल्याचे’ वक्तव्य केले आहे. ज्यांच्या आजोबांनी अक्साईसह तिबेट चीनच्या घशात घातला, त्यांना चीनविषयी कुठल्याच सूत्रावर बोलण्याचा अधिकार नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे. चीन-भारत सीमाप्रश्नाचा संघर्ष टोकाला गेला असतांना चीनच्या राजदुतांच्या भेटीला गेलेले राहुल गांधी ‘चीन गलवानमध्ये झेंडा फडकावत आहे’ किंवा ‘त्याने पँगाँग तलावावर पूल बांधला आहे’, याविषयी पंतप्रधानांना ट्वीटरद्वारे टोमणे मारण्याचे दुःसाहस करत आहेत. नेहरूंनी चीनच्या गळ्यात गळे न घालता चीनला धडा शिकवला असता, तर चीन आज एवढा विस्तारला नसता. त्यामुळे राहुल गांधी यांनी नसती बडबड करण्यापेक्षा आजोबांच्या चुकीचे प्रायश्चित्त घ्यावे.

चीनवरही सर्जिकल स्ट्राईक हवा !

आता मिराम याच्या मित्राची सुटका होईलही; पण भारताच्या भूमीत येऊन त्यावर हक्क सांगून तेथील जनतेचे अपहरण करणार्‍या चीनला धडा कधी शिकवला जाणार ? असेच आता भारतियांना वाटत आहे. भारत आता या प्रकरणी काय पावले उचलतो, त्या घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत. भारत सरकार आणि माध्यमे या दोघांच्या दृष्टीने ही घटना अतिशय महत्त्वाची आहे. भारतीय माध्यमांनी जेवढे अभिनंदन यांचे प्रकरण गांभीर्याने लावून धरले, तेवढेच हे प्रकरण उचलून जनजागृती करायला हवी. भारत सरकारने आता या घटनेच्या निमित्ताने चीनला कुटनीती किंवा सर्जिकल स्ट्राईक यांसारख्या काही अन्य उपाययोजना काढून चीनला चांगलाच धडा शिकवायला हवा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही हे सूत्र नेऊन वाचा फोडायला हवी.