तीर्थक्षेत्र विकासाची कामे कालबद्धरितीने पूर्ण होण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी समन्वय ठेवावा ! – उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे

डॉ. नीलम गोर्‍हे

मुंबई – एकवीरा, लेण्याद्री, पंढरपूर देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी, तसेच भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजित आराखड्यानुसार कामांना गती द्यावी. कामे कालबद्धरितीने पूर्ण होण्यासाठी संबंधित विभागांशी जिल्हाधिकार्‍यांनी समन्वय ठेवावा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी दिले.

१. एकवीरा, लेण्याद्री, तसेच पंढरपूर देवस्थानच्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने चालू असलेल्या कामांचा, तसेच वेळोवेळी दिलेल्या निर्देशांच्या कार्यवाहीचा उपसभापती डॉ. गोर्‍हे यांनी ‘ऑनलाईन’ बैठकीद्वारे १९ जानेवारी या दिवशी आढावा घेतला. या वेळी पुणे येथील जिल्हाधिकारी राजेश देशमुख, सोलापूर येथील जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

२. डॉ. गोर्‍हे म्हणाल्या की, देवस्थानांच्या विकासासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून भरीव निधीची तरतूद केली आहे. विश्वस्त आणि प्रशासन यांच्यामध्ये चांगला समन्वय साधून देवस्थानने विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत.

३. एकवीरा देवस्थान येथे पायर्‍यांच्या दुरवस्थेमुळे भाविकांना त्रास होत असल्याने दुरुस्तीला प्राधान्य देण्यात यावे. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची संख्या वाढवणे, त्यांच्यासाठी निवारा, सीसीटीव्हीची निगराणी यांविवषयी दक्षता घ्यावी, असेही त्या म्हणाल्या.