परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भेटीच्या वेळी पू. जनार्दन वागळेआजोबांची (वय १०० वर्षे) अनुभवलेली भावावस्था !

पौष कृष्ण पक्ष पंचमी (२३.१.२०२२) या दिवशी पू. जनार्दन कृष्णाजी वागळेआजोबा यांना १०० वर्षे पूर्ण होत आहेत. आज १८.१.२०२२ या दिवशी देवीहसोळ, जिल्हा रत्नागिरी येथे त्यांच्या निवासस्थानी महामृत्युंजय याग करण्यात येणार आहे. त्या वेळी त्यांची गुळाने तुला करण्यात येईल आणि पाच सुवासिनी कणकेच्या १०० दिव्यांनी त्यांचे औक्षण करतील. त्या निमित्ताने पू. वागळेआजोबांची भावावस्था आणि त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

पू. जनार्दन कृष्णाजी वागळेआजोबा यांना शताब्दीपूर्तीनिमित्त सनातन परिवाराच्या वतीने शिरसाष्टांग नमस्कार !

१. अखंड भावावस्थेत असणारे पू. जनार्दन वागळेआजोबा !

‘प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) भेटीसाठी पू. आजोबांना प.पू. गुरुदेवांकडे घेऊन जातांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ मला म्हणाल्या, ‘‘पू. आजोबा अखंड भावावस्थेत आहेत.’’ ‘त्यांची ती भावावस्था अजूनही तशीच आहे’, असे मला वाटते.

२. पू. जनार्दन वागळेआजोबांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भेटीच्या वेळी त्यांना मिठी मारणे

परात्पर गुरु डॉ. आठवले

प.पू. गुरुदेवांच्या भेटीच्या वेळी पू. आजोबांनी प.पू. गुरुदेवांना मिठी मारली. तो एक अविस्मरणीय क्षण होता. पू. आजोबा आतापर्यंत जेव्हा प.पू. गुरुदेवांना भेटले आहेत, तेव्हा त्यांनी प.पू. गुरुदेवांना मिठी मारली आहे. त्या वेळी ‘गुरु-शिष्य भेट कशी असते ?’, हे आम्हाला अनुभवता आले.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले मला आणि माझ्या यजमानांना (श्री. विजय लोटलीकर यांना) म्हणाले, ‘‘आता तुम्हाला घरच्या घरी गुरुसेवा मिळाली.’’

श्री. विजय लोटलीकर

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. आजोबांचे कौतुक करून त्यांना आनंद देणे

भेटीच्या वेळी बोलणे चालू असतांना प.पू. गुरुदेव आजोबांना म्हणाले, ‘‘तुम्ही १०० वर्षांचे तरुण आणि मी ८० वर्षांचा म्हातारा आहे. माझे गुडघे दुखतात. त्यामुळे मला अधिक चालता येत नाही.’’ यावरून ‘प.पू. गुरुदेव पू. आजोबांचे कौतुक करून त्यांना आनंद देत आहेत’, असे आम्हाला वाटले.

५. कोरोना महामारी असल्यामुळे पू. जनार्दन वागळेआजोबा गोव्यात आल्यानंतरही त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी लवकर भेट न होणे

पू. आजोबा प.पू. गुरुदेवांना म्हणाले, ‘‘मला तुमची फार आठवण येत होती.’’ तेव्हा प.पू. गुरुदेव म्हणाले, ‘‘मलाही तुमची फार आठवण येत होती. ‘तुम्हाला इकडे गोव्यात येऊन एवढे दिवस झाले, तरी तुम्ही अजून भेटायला का आला नाहीत ?’, असे मला वाटत होते.’’ तेव्हा मी म्हणाले, ‘‘कोरोना महामारीमुळे भेटायला येणे कठीण होते.’’

६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली प्रीती !

पू. आजोबांची छायाचित्रे काढण्यासाठी त्यांना दुसर्‍या खोलीमध्ये जायचे होते. प.पू. गुरुदेव साधकांना म्हणाले, ‘‘आजोबांना आसंदीत बसवून नेऊया.’’ तेव्हा आजोबा त्यांना म्हणाले, ‘‘मला आसंदी नको. मी चालत जाईन.’’ त्यातून प.पू. गुरुदेवांची सतर्कता, इतरांचा विचार आणि प्रीती हे गुण आम्हाला शिकायला मिळाले. त्या वेळी आम्हाला ‘आमच्याकडून पू. आजोबांचा एवढा विचार कधी होत नाही’, या चुकीची जाणीव झाली.

७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी भेटस्वरूपात दिलेले त्यांचे छायाचित्र पहातांना पू. आजोबा पुष्कळ वेळ भावस्थितीत असणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र पहातांना पू. जनार्दन वागळेआजोबा यांची भावावस्था

दुसर्‍या खोलीत गेल्यानंतर प.पू. गुरुदेवांनी पू. आजोबांना एक पिशवी दिली आणि ‘त्यात काय आहे ?’, ते पहाण्यास सांगितले. त्यात प.पू. गुरुदेवांचे छायाचित्र होते. पू. आजोबा त्या छायाचित्राकडे बघत राहिले. नंतर त्यांनी ते छातीशी कवटाळले. तेव्हा पू. आजोबा बराच वेळ भावावस्थेत होते. तेव्हा प.पू. गुरुदेव साधकांना म्हणाले, ‘‘हे आपण पहिल्यांदाच अनुभवत आहोत. पू. वागळेआजोबांची ही भावावस्था आहे. याची छायाचित्रे काढून घ्या. हे फार महत्त्वाचे आहे.’’

८. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. जनार्दन वागळेआजोबांच्या देहातील वैशिष्ट्यांची छायाचित्रे काढण्यास सांगणे

प.पू. गुरुदेव तेथील साधकांना म्हणाले, ‘‘पू. आजोबांची अखंड भावावस्था आहे. त्यांच्या घरी जाऊन त्यांची सर्व छायाचित्रे काढून घ्या.’’ प.पू. गुरुदेवांनी छायाचित्रे काढण्यास सांगितलेली पू. आजोबांच्या देहातील वैशिष्ट्य येथे दिली आहेत.

सौ. संगीता लोटलीकर

अ. बहुतेकांची बोटे लांब असतात; पण पू. आजोबांचे हात आणि पाय यांची बोटे आखूड आहेत. त्यांचे हे निराळेपण आहे.

आ. पू. आजोबांच्या कानाच्या पाळ्या पुष्कळ मोठ्या आणि मऊ आहेत.

इ. पू. आजोबांचे पूर्ण केस पांढरे झाले होते. आता त्यांचे केस मध्ये मध्ये काळे दिसतात आणि ते मुलायम झाले आहेत.

९. कृतज्ञता

वरील लिखाण करतांना माझ्या डोळ्यांसमोर प.पू. गुरुदेव आणि पू. आजोबा यांच्या भेटीचे दृश्य तरळत होते. त्यामुळे बर्‍याच दिवसांपासून मला (सौ. संगीता यांना) आलेली मरगळ निघून गेली. हे सर्व प.पू. गुरुदेवच माझ्याकडून लिहून घेत आहेत’, असा माझा भाव होता. हे सर्व लिहून घेतल्याबद्दल प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’

– सौ. संगीता लोटलीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) आणि श्री. विजय लोटलीकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)(पू. वागळेआजोबांची मुलगी आणि जावई), फोंडा, गोवा. (५.१.२०२१)