(म्हणे) ‘पंतप्रधान मोदी आणि शीख यांच्यापैकी एकाची निवड करा !’

  • पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्याच्या प्रकरणी अन्वेषण करणार्‍या समितीच्या अध्यक्षा निवृत्त न्यायाधीश इंदु मल्होत्रा यांना धमकी 

  • ‘सिख फॉर जस्टीस’ या संघटनेकडून धमकी मिळाल्याची माहिती 

  • ‘सिख फॉर जस्टीस’कडून सर्वोच्च न्यायालयाच्या अधिवक्त्यांनाही धमक्यांचे दूरभाष 

खलिस्तानी आतंकवादी संघटनांचा निःपात न केल्यामुळेच त्यांचे दुःसाहस वाढत चालले आहे, हे यातून दिसून येते. हे थांबवण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक ! – संपादक

देहली – पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत राहिलेल्या त्रुटीच्या प्रकरणाचे अन्वेषण करणार्‍या समितीच्या अध्यक्षा निवृत्त न्यायाधीश इंदू मल्होत्रा यांना ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शीख यांच्यापैकी एकाची निवड करा. या प्रकरणाचे अन्वेषण पुढे जाऊ देऊ नका. कोणत्याही परिस्थितीत या प्रकरणी माजी न्यायाधीशांना अन्वेषण करू देणार नाही’, अशी धमकी देण्यात आली आहे. ही धमकी ‘सिख फॉर जस्टीस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेने दिल्याचे प्रसारमाध्यमांकडून सांगण्यात येत आहे. या संघटनेने धमकी देणारी ध्वनीफीत (ऑडिओ क्लिप) पाठवली आहे, ज्यात वरील धमकी दिली आहे.

१. एका वृत्तपत्रसमूहाने दिलेल्या माहितीनुसार या ध्वनीफितीत असेही म्हटले आहे की, ‘आम्ही सर्वोच्च न्यायालयातील सर्व अधिवक्त्यांची सूची बनवत आहोत आणि सर्वांचा ‘हिशोब’ केला जाईल. हे सूत्र पंतप्रधान मोदी आणि शीख यांच्यामधील होते; पण तुम्ही (इंदू मल्होत्रा यांनी) ‘एस्.एफ्.जे.’ (सिख फॉर जस्टीस)च्या विरुद्ध तक्रार प्रविष्ट करून स्वतःला संकटात टाकले आहे. आता आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या मुसलमानविरोधी आणि शीखविरोधी अधिवक्त्यांना उत्तरदायी ठरवू.

२. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिवक्त्यांनी १० जानेवारी या दिवशी दावा केला होता की, त्यांना धमकी देणारे दूरभाष येत आहेत. यात पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेचे सूत्र सर्वोच्च न्यायालयात न उठवण्याविषयी आणि त्यावरील सुनावणीत साहाय्य न करण्याची धमकी देण्यात आली होती.