महर्षींच्या आज्ञेने श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी तमिळनाडूतील ‘अरिगनर अण्णा झूलॉजिकल पार्क’ या प्राणीसंग्रहालयाला भेट दिल्यानंतर केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘महर्षींनी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना तमिळनाडूतील ‘अरिगनर अण्णा झूलॉजिकल पार्क’ या प्राणीसंग्रहालयात जाण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे १८.१२.२०२१ या दिवशी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ तेथे गेल्यानंतर माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे दिले आहे.

प्राणीसंग्रहालयालयात उभ्या असलेल्या श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ

१. सद्गुरुद्वयींच्या माध्यमातून श्री महालक्ष्मीदेवीची दैवी शक्ती कार्यरत झाल्यामुळे पृथ्वीवर वर्ष २०२५ नंतर हिंदु राष्ट्र स्थापन होणार असणे

ईश्वराच्या कृपेने श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या माध्यमातून पृथ्वीवर हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे. पृथ्वीवर स्थुलातून हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात श्री महालक्ष्मीदेवीची दैवी शक्ती सद्गुरुद्वयी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून कार्यरत झाली असून त्यांच्याकडून प्रक्षेपित होणारी दैवी शक्ती वायूमंडलात प्रक्षेपित होते. त्यामुळे दूषित झालेल्या वायूमंडलाची शुद्धी होऊन देवतांच्या तत्त्वलहरी पृथ्वीकडे आकृष्ट होत आहेत. त्यामुळे पृथ्वीवर वर्ष २०२५ नंतर हिंदु राष्ट्र स्थापन होणार आहे.

२. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यामुळे पृथ्वीवरील साधकांना, तर श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामुळे विविध ठिकाणच्या मनुष्यांना अन् विविध योनींतील, तसेच शापित जिवांना लाभ होणे

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामध्ये श्री महालक्ष्मीदेवीची कार्यरत झालेली दैवी शक्ती अत्यंत कल्याणकारी आहे. सद्गुरुद्वयी सतत शिवदशेत असल्यामुळे त्यांच्या अंत:करणात सतत सर्व जिवांचा उद्धार करण्याचा सात्त्विक विचार कार्यरत असतो. त्यामुळे जेव्हा श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे दर्शन आणि मार्गदर्शन लाभते, तेव्हा पृथ्वीवरील विविध साधकांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होऊन त्यांचा उद्धार होतो. जेव्हा श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांचे दर्शन आणि मार्गदर्शन लाभते, तेव्हा पृथ्वीवरील विविध ठिकाणच्या केवळ मनुष्यांनाच नव्हे, तर प्राण्यांसारख्या विविध योनींत अडकलेल्या आणि सूक्ष्म स्तरावर कार्यरत असणार्‍या अनेक शापित जिवांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होऊन त्यांचा उद्धार होतो.

३. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.)  गाडगीळ यांनी प्राणीसंग्रहालयात प्रवेश केल्यावर त्यांच्या दैवी शक्तीचा परिणाम तेथील प्राण्यांवर होणे

कु. मधुरा भोसले यांना सूक्ष्मातून दिसल्याप्रमाणे प्रत्यक्षातही प्राणीसंग्रहालयात असलेला वयोवृद्ध सिंह (गोलात दाखवला आहे.)

३ अ. श्रीमहालक्ष्मीस्वरूप श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याकडून प्रक्षेपित झालेल्या दैवी शक्तीमुळे प्राणीसंग्रहालयातील वयोवृद्ध सिंहाचा उद्धार होणे : जेव्हा श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांनी प्राणीसंग्रहालयात प्रवेश केला, तेव्हा मला सूक्ष्मातून दृश्य दिसले की, एका वयोवृद्ध सिंहाला श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांच्या दैवी शक्तीची चाहूल लागल्यामुळे तो त्यांची वाट पहात येरझार्‍या घालत होता. हा सिंह गेल्या जन्मी सात्त्विक मनुष्य होता; परंतु त्याची शनीची साडेसाती चालू असतांना त्याची मती (बुद्धी) फिरली आणि त्याने एका निष्पाप व्यक्तीची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. त्यामुळे त्याला मृत्यूनंतर ६०० वर्षे नरकयातना भोगाव्या लागल्या आणि त्यानंतर त्याला पृथ्वीवर सिंहाचा जन्म मिळाला. त्याने गेल्या जन्मात केलेल्या काही पुण्यकर्मांमुळे ईश्वराच्या कृपेने त्याची सात्त्विक बुद्धी १८.१२.२०२१ या दिवशी जागृत झाली आणि त्याला गतजन्माचे ज्ञान मिळाले. त्यामुळे तो त्याची ‘सिंह’ योनीतून मुक्तता होण्यासाठी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांची वाट पहात होता. जेव्हा श्रीचित्‌शक्‍ति (सौ.)  गाडगीळ यांनी प्राणीसंग्रहालयात प्रवेश केला, तेव्हा तेथील वयोवृद्ध सिंहाने सूक्ष्मातून येऊन श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांच्या डाव्या पायाचे पाऊल चाटून त्यांना ३ वेळा प्रदक्षिणा घातली आणि त्यांना नमन करून स्वत:च्या उद्धारासाठी प्रार्थना केली. तेव्हा श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांच्या हृदयात सिंहाप्रतीचा करुणाभाव जागृत झाला आणि त्यांच्या अनाहतचक्रातून सिंहाच्या दिशेने लाल रंगाच्या दैवी शक्तीचा प्रवाह प्रवाहित झाला अन् सिंहाच्या देहामध्ये दैवी शक्ती कार्यरत होऊन त्याच्या गतजन्मीच्या पापकर्माच्या फळांचा विनाश होण्याची प्रक्रिया चालू झाली. काही दिवसांनी जेव्हा त्याच्या पापाचे फळ पूर्णपणे नष्ट होईल, तेव्हा या सिंहाचा मृत्यू होऊन त्याला प्राण्यांच्या भोगयोनीतून मुक्ती मिळून पुढील जन्मी योगयोनीत, म्हणजे मनुष्यजन्म मिळून तो साधना करील. (प्रत्यक्षातही प्राणी संग्रहालयात वयोवृद्ध सिंह दिसला. – श्री. विनायक शानभाग, तमिळनाडू)

कु. मधुरा भोसले

३ आ. श्रीमहालक्ष्मीस्वरूप श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडून प्रक्षेपित झालेल्या दैवी शक्तीमुळे प्राणीसंग्रहालयातील सर्पाचा उद्धार होणे : जेव्हा सर्प त्याची जुनी कात टाकतो, तेव्हा तो तरुण आणि दीर्घायुषी होतो. जेव्हा श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांनी सर्पसंग्रहालयाला भेट दिली, जेव्हा त्यांनी देवाला ‘सर्पयोनीतून या जिवांची मुक्ती होऊ दे ’, अशी प्रार्थना केली. त्यामुळे भक्तस्वरूप असणार्‍या श्रीचित्‌शक्‍ति (सौ.)  गाडगीळ यांच्या हृदयातील भावपूर्ण प्रार्थना भगवंताने ऐकून ‘तथाऽस्तु ।’ म्हटले. त्यानंतर श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांच्या हृदयात सर्पांप्रतीही करुणाभाव जागृत झाला आणि त्यांच्या अनाहतचक्रातून सर्पांच्या दिशेने लाल रंगाच्या दैवी शक्तीचा प्रवाह प्रक्षेपित झाला. त्यामुळे तेथील एका सर्पाला त्यांच्याकडून दैवी ऊर्जा मिळाल्याने त्याने जुनी कात टाकून नवीन कात धारण केली. (संतकृपेमुळे सापाची कात पालटण्याची प्रक्रिया येथे गतीने होते. सर्वसाधारण स्थितीत कात टाकण्याच्या प्रक्रियेस काही दिवस लागतात. – आधुनिक पशूवैद्य अजय जोशी) अशा प्रकारे या सर्पाला दैवी ऊर्जा मिळून नवतारुण्य प्राप्त झाले.

श्री. विनायक शानभाग यांनी मला या सर्पाचे छायाचित्र पाठवले, तेव्हा त्याची कात पाहिल्यावर त्यावर त्रासदायक शक्तीचे आवरण असल्याचे जाणवले आणि कात टाकलेल्या सापाकडे पाहून सात्त्विक स्पंदने जाणवली अन् मला शिवाची आठवण झाली. या सर्पामध्येही श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांची दैवी ऊर्जा कार्यरत झाल्यामुळे त्याची सात्त्विक बुद्धी कार्यरत होऊन त्याला शिवाचा नामजप करण्याची प्रेरणा मिळून त्याचा ‘ॐ नम: शिवाय ।’, हा नामजप चालू झाला. शिवाचा नामजप केल्यामुळे त्या सर्पाला या जन्मात मुक्ती मिळून तो शिवलोकात दैवी सर्प बनून जाणार आहे.

३ इ. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या दैवी शक्तीमुळे प्राण्यांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होणे

४. महर्षींनी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांना प्राणीसंग्रहालयात जाण्यास सांगण्यामागील कार्यकारणभाव

महर्षींना ठाऊक होते की, ‘तमिळनाडूतील काही प्राणी शापित असून त्यांना त्यांच्या मागील जन्मांची स्मृती झाल्यावर त्यांच्या पापकर्मांचा पश्चात्ताप होऊन ते भगवंताकडे त्यांच्या मुक्तीची प्रार्थना करणार आहेत. हे प्राणी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांच्यासारख्या उन्नतांची येण्याची वाट पहात आहेत.’ त्यामुळे महर्षींनी ‘श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या दैवी शक्तीचा लाभ होऊन प्राण्यांचा उद्धार व्हावा’, यासाठी त्यांना प्राणीसंग्रहालयात जाण्यास सांगितले होते. त्यामुळे जेव्हा श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ प्राणीसंग्रहालयात गेल्या, तेव्हा तेथील प्राण्यांना आध्यात्मिक स्तरावर लाभ झाला.

कृतज्ञता

‘देवाच्या कृपेने श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांनी प्राणीसंग्रहालयाला भेट दिल्यामुळे सूक्ष्म स्तरावर प्राण्यांना किती प्रमाणात लाभ झाला’, हे शिकायला मिळाले’, यासाठी मी देवाच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’

– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.१२.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.