हिंदूंनी म्हटले तर ‘हेट स्पीच’ आणि अहिंदूंनी म्हटले, तर ते ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्य’, हे कधीपर्यंत चालणार ? – हिंदु जनजागृती समितीचा प्रश्न

यति नरसिंहानंद यांच्या अटकेचा हिंदु जनजागृती समितीकडून निषेध !

मुंबई – हरिद्वार येथे डिसेंबर २०२१ मध्ये झालेल्या धर्मसंसदेत मुसलमान समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले; म्हणून श्री. जितेंद्र नारायण त्यागी (पूर्वीचे वसीम रिझवी) यांच्या पाठोपाठ यति नरसिंहानंद सरस्वती यांनाही हरिद्वार पोलिसांनी अटक केली.

आक्षेपार्ह वक्तव्ये केली; म्हणून हिंदू नेते आणि संत यांना अटक होते; मात्र वसीम रिझवी यांचा शिरच्छेद करण्यासाठी लाखो रुपयांचा पुरस्कार घोषित करणारे भाग्यनगर (हैदराबाद) येथील काँग्रेसचे नेते महंमद फिरोज खान आणि रशीद खान, तसेच मुसलमानांवरील कथित अत्याचारप्रकरणी उत्तरप्रदेश पोलिसांना उघडउघड धमकावणारे एम्.आय.एम्.चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही.

श्री. रमेश शिंदे

या देशात हिंदूंना एक न्याय आणि मुसलमानांना वेगळा न्याय आहे का ? देशात हिंदूंनी काही म्हटले, तर ते ‘हेट स्पीच’ (द्वेषपूर्ण वक्तव्य) आणि अहिंदूंनी काहीही म्हटले, तरी त्याला ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्य’ म्हटले जाते, हे कधीपर्यंत चालणार, असा प्रश्न हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

(समितीचे प्रसिद्धी पत्रक वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

‘काही दिवसांपूर्वी छत्तीसगड येथून कालीचरण महाराज यांना अटक केल्याचे प्रकरण ताजे असतांना आता यति नरसिंहानंद यांना अटक करण्यात आली. अनेक हिंदुद्रोही नेते हिंदु देवता, संत, धर्मग्रंथ यांच्यावर, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अत्यंत खालच्या थराला जाऊन बोलतात; मात्र ते ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्य’ असते. हिंदूंचा धर्मग्रंथ असलेली ‘मनुस्मृति’तर जाहीररित्या जाळली जाते; मात्र ती जाळणार्‍यांवर कोणीच कारवाई केली जात नाही. वसीम रिझवी जर एखाद्या धर्मग्रंथांतील काही आक्षेपार्ह सूत्रांविषयी चर्चा करत असतील, तर त्यांच्यावर कारवाई केली जाते. धर्मग्रंथांतील हिंसेविषयी कोणी चर्चा करत असेल, तर त्यात चुकीचे काय आहे ? गांधींच्या चुकांची कोणी समिक्षा करत असेल, तर त्यात चूक काय आहे ? हिंदु संत आणि नेते यांना अटक करून हिंदूंचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे हिंदु समाज कदापि सहन करणार नाही’, असे समितीने तिच्या पत्रकात म्हटले आहे.