भेदभाव नको !

नोंद 

सातारा नगरपालिका एक ऐतिहासिक नगरपालिका आहे. आतापर्यंत राजघराण्यातील अनेक महनीय व्यक्तींनी सातारा नगरपालिकेचा कारभार यशस्वीरित्या हाताळला आहे; मात्र हीच नगरपालिका आता कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेली आहे. कोरोनामुळे नगरपालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत अल्प झाले असून नागरिकांना साहाय्य करण्यासाठी आर्थिक तडजोडी कराव्या लागत आहेत. महसूल हा नगरपालिकेचा महत्त्वाचा उत्पन्नाचा स्रोत मानला जातो; मात्र आजही घरपट्टी, पाणीपट्टी आदी स्वरूपाचे सातारा नगरपालिकेला येणे असलेले कोट्यवधी रुपये थकीत आहेत.

शिवतीर्थावरील (पोवईनाका) एका खासगी व्यावसायिकाने सातारा नगरपालिकेचा १ कोटी २५ लाख रुपये मालमत्ता कर थकवला आहे. असे असूनही सातारा नगरपालिकेने व्यावसायिकाच्या खासगी रस्त्याचे डांबरीकरण करून दिले आहे, याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे नगरपालिकेने याविषयी कमालीची गुप्तता पाळली आहे, तसेच या व्यावसायिकाच्या इमारतीला धोकादायक ठरणारी २ मोठी झाडे कोणत्याही पंचनाम्याविना तोडण्यात आली आहेत. एकूण हे सर्व प्रकरण पहाता नगरपालिका आणि संबंधित व्यक्ती काय करत आहेत ? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडत आहे. याचे कारण या व्यावसायिकाची सव्वाकोटी रुपयांची घरपट्टी थकीत असूनही त्यावर शासकीय नियमाप्रमाणे दंड (शास्ती) लावण्याऐवजी त्याला अजूनच सुविधा पुरवल्या जातात, हे गंभीर आणि संतापजनक आहे.

खासगी व्यावसायिकासाठी रस्ता करण्याविषयी जी तत्परता दाखवली, तशी तत्परता सामान्य सातारावासियांसाठी नगरपालिका दाखवत नाही, हे चिंताजनक आहे. सामान्य सातारावासियांची थकबाकी वसूल करण्यासाठी मालमत्ता ‘सील’ करण्याचे आदेश देणारे पालिका प्रशासन कर थकवणार्‍या व्यावसायिकांची मालमत्ता ‘सील’ करणार का ? असा प्रश्न अनुत्तरित रहातो. सर्वांना समान न्याय या भूमिकेत प्रशासन केव्हा येणार ? जोपर्यंत भेदभाव करण्याची मानसिकता जात नाही, तोपर्यंत स्वच्छ कारभार कसा होणार ? भारताचा खर्‍या अर्थाने विकास करायचा असेल, तर प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांची मानसिकता पालटायला हवी. यासाठी चूक कुणाचीही असो, त्याला कठोर शिक्षा हाच उपाय आहे. हिंदु राष्ट्रात भेदभाव नसून तत्त्वनिष्ठ कारभार असेल !

– श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा