त्यागमय जीवन भारताची ओळख !

संपादकीय 

देशासाठी सर्व संपत्ती दान करणारे राष्ट्रप्रेमी नागरिक इतरांसाठी आदर्शच !

आधुनिक वैद्य राजेंद्र कंवर

हिमाचल प्रदेश मधील शासकीय सेवेतून निवृत्त झालेले आधुनिक वैद्य राजेंद्र कंवर यांनी पत्नीची अंतिम इच्छा म्हणून कोट्यवधी रुपयांची संपत्ती सरकारच्या नावावर केली आहे. त्यांना थेट कुणी वारसदार नसल्याने त्यांनी अन्य नातेवाइकांसमवेत बैठक घेऊन संपत्ती सरकारला दान केल्याचे घोषित केले. आधुनिक वैद्य राजेंद्र कंवर हे सरकारच्या आरोग्य विभागातून आणि त्यांची पत्नी शिक्षण विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या पत्नीचे गेल्या वर्षी निधन झाले. त्यांनी निधनापूर्वी स्वत:ची संपूर्ण संपत्ती सरकारला दान करण्याचे ठरवले होते. ‘सरकारने या पैशांतून ज्या लोकांना घरात रहाण्यास जागा दिली जात नाही आणि वृद्धापकाळात ज्यांना उन्हातान्हात भटकावे लागते अशांना साहाय्य करावे,’ अशी अटही आधुनिक वैद्य कंवर यांनी घातली आहे. त्यांनी स्वत:च्या मोठ्या घरासह, स्वत:ची गाडी आणि राष्ट्रीय महामार्गालगतची ५ एकर भूमीही दान केली आहे. आधुनिक वैद्य कंवर हे सध्या त्यांच्या रहात्या घरीच शेकडो गरीब रुग्णांवर विनामूल्य उपचार करत आहेत. आधुनिक वैद्य कंवर यांनी त्यांच्या या कृतीतून सर्व देशवासियांसमोर त्यागाचा आदर्श ठेवला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चितळे दांपत्य

यापूर्वी चितळे दांपत्याने स्वत:चे लाखो रुपयांचे दागिने सियाचीन येथे सैनिकांसाठी रुग्णालयात ऑक्सिजन उपलब्ध होण्यासाठी मोठा प्रकल्प बांधण्यासाठी सरकारला दान दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:हून त्यांची नोंद घेऊन त्यांची भेट घेतली. दानधर्माची भारतीय समाजात परंपरा आहेच, त्यात एवढे काय ? असेही एखाद्याला वाटू शकते; मात्र सर्वसामान्य भारतीय आयुष्यभर कष्ट करून जी काही मिळकत प्राप्त करतो, ती सरकारकडे देशकार्यासाठी जमा करण्याची उदाहरणे विरळच आहेत आणि ती उदाहरणे आदर्श आहेत. एखाद्या श्रीमंताने त्याच्याकडील काही संपत्ती देणे आणि एखाद्या सर्वसाधारण मध्यमवर्गियाने स्वत: जवळील सर्व काही दान करणे यांमध्ये मोठा भेद आहे. हा उत्तम संस्कार, राष्ट्रप्रेमाची आणि समाजाविषयीची तीव्र संवेदना, व्यापकता, परोपकार, निर्माेही वृत्ती इत्यादी गुणांचा परिपाक आहे.

पंतप्रधान मोदींची आदर्शवत् कृती !

स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते गुजरात राज्याचे मुख्यमंत्री असतांना त्यांना ज्या काही भेटवस्तू मिळाल्या होत्या, सन्मान मिळाले होते, ते पंतप्रधानपदाची सूत्रे घेण्यासाठी देहली येथे जाण्यापूर्वी लिलावात विकून त्यातून गोळा झालेली रक्कम मुलींच्या कल्याणाच्या योजनांसाठी सरकारकडे जमा केली होती.

मुख्यमंत्री असतांना मिळालेल्या वेतनातीलही बरीच रक्कम त्यांनी दान केली होती. तेथील सरकारी अधिकारी मोदी यांना  ‘स्वत:साठी काहीतरी ठेवा’, असे सांगत होते; मात्र मोदी यांनी ‘मला यांची काही आवश्यकता नाही. मी एकटाच असतो’, असे सांगून स्वत:च्या साधेपणाची झलक दिली. पंतप्रधानपदाच्या पहिल्या ५ वर्षांच्या कार्यकाळात त्यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव केल्यावर गोळा झालेली १०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम त्यांनी गंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी राबवल्या जाणार्‍या ‘नमामी गंगे’ या महाकाय प्रकल्पासाठी दान केली.

भारतियांचे आदर्श !

त्याग हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य आणि सर्वांत व्यापक गुण आहे. भारतीय संस्कृती ही मुळात त्यागावर आधारित आहे, तर विदेशी सभ्यता ही भोगावर आधारित आहे. स्वत: मर्यादापुरुषोत्तम प्रभु श्रीराम यांनी चक्रवर्ती सम्राटाचा पुत्र असूनही केवळ माता कैकेयीच्या इच्छेसाठी राजविलास त्यागून १२ वर्षे वनवास पत्करला. सोन्याची लंका जिंकूनही ते राज्य बिभीषणाला देऊन ते अयोध्येला आले. छत्रपती शिवरायांनी त्यांच्या कार्यकाळात जिंकलेले शेकडो किल्ले आणि हिंदवी स्वराज्य समर्थ रामदासस्वामी यांच्या चरणी अर्पण केले होते. सर्व सुखे उपलब्ध असतांना त्यांचा उपभोग घेण्याऐवजी त्याग केला, तर त्यातून अधिक आनंद मिळतो, या अर्थाचे एक संस्कृत सुभाषित आहे; मात्र हा प्रयत्न पुष्कळ अल्प जण करतात. सध्या भारतियांसमोर कोणते आदर्श आहेत, तर चित्रपट अभिनेते, अभिनेत्री, क्रिकेटचे खेळाडू, काहींसाठी राजकारणी, मॉडेल इत्यादी. त्यांच्याच विषयीच्या माहितीने संकेतस्थळाची आणि दैनिकांची पाने भरलेली असतात. साहजिकच समाज विशेषत: युवावर्ग त्यांच्या प्रत्येक कृतीचे अनुकरण करतो. त्यानुसार वागण्या-बोलण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्याला देश, समाज यांपेक्षा स्वत:चे महत्त्व वाटू लागते. इतरांसाठी काही करणे तर दूरच; पण एखादा अपघात झाल्यावर त्याला रुग्णालयात नेणे, साहाय्य करणे असे माणुसकीचे औदार्यही लोकांकडून दाखवण्यात येत नाही. उलट त्याच्याकडील वस्तू, पैसे, साहित्य यांची लुटालुट करण्याची लोकांमध्ये स्पर्धा असते. दुसर्‍याला ओरबाडून स्वत:ला अधिकाधिक पैसे, सुख कसे मिळेल ? याचा समाज सध्या विचार करतो. त्यामुळे भ्रष्टाचार, लाचखोरी, भेसळ, विविध प्रकारचे घोटाळे इत्यादींचे प्रमाण वाढले आहे. ‘जीवन असेच असते’, असाच काहीसा गैरसमज झाला आहे. पालकांकडून मुलांवर‘ भरपूर शिक, मोठा हो आणि भरपूर पैसे कमव. तुला हे पैसेच म्हातारपणी कामी येतील’, अशी शिकवण दिली जाते. परिणामी मुलगा त्यानुसार कृती करतोच; मात्र त्याला पुढे आई-वडीलही नकोसे वाटून त्यांनाही तो वृद्धाश्रमात पाठवून देतो.

त्यागाचा आदर्श हवा !

‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दूंगा’, असे सांगणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांसारखे राष्ट्रपुरुष अजरामर होतात, तर लोकांना २ रुपये, ३ रुपये किलो तांदूळ, विनामूल्य वीज, विनामूल्य वस्तू इत्यादींची लालूच दाखवणारे राजकारणी लोकांच्या विस्मृतीत जातात, हेच सत्य आहे. व्यक्ती जन्माला येतांनाच देव, ऋषि, समाज, पितर इत्यादी ऋणे घेऊनच जन्माला येतो. ज्यांना गुरुप्राप्ती झाली आहे, त्यांना गुरुऋणही असते. ज्या समाजात आपण रहातो, त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो, ही भावना भारतियांमधून लुप्त होत चालली आहे. ही भावना वर्धिष्णू होण्यासाठी अवतार, राष्ट्रपुरुष, क्रांतीकारक यांसह कंवर दांपत्याचाही आदर्श त्यांनी घ्यायला हवा !