वर्धा येथील अनधिकृत गर्भपात प्रकरण
वर्धा – जिल्ह्यातील आर्वी येथील अनधिकृतरीत्या गर्भपात प्रकरणात नवीन खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वच अनुषंगाने या प्रकरणाचे अन्वेषण केले जाणार असून आवश्यकता भासल्यास मिळालेली हाडे आणि कवटी यांची डी.एन्.ए. चाचणीही केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी १३ जानेवारी या दिवशी आर्वी पोलीस ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले की,
१. या प्रकरणात गोबर गॅसच्या खड्यात भ्रूणांचे अवशेष आणि हाडे यांची विल्हेवाट लावण्यात आल्याचे समोर आले. रुग्णालयाच्या आवारात सापडलेल्या भ्रूणांच्या ११ कवट्या आणि ५५ हाडे यांचा चाचणी अहवाल नागपूर येथील प्रयोगशाळेकडून मागवण्यात येणार आहे.
२. जप्त करण्यात आलेल्या नोंदवहीमध्ये ८ महिलांचा गर्भपात झाल्याची माहिती आहे. यात ११ पैकी ८ तेच आहेत का ? अधिकच्या ३ कवट्या कुणाच्या आहेत ? याची नोंद का केली नाही ? हे पाहिले जाईल.
३. नोंदवहीत नोंद असलेले गर्भपात हे कायदेशीर आहेत का ? अल्पवयीन मुलींचे गर्भपात झाल्यास त्याची माहिती पोलीस ठाण्याला तात्काळ देणे आवश्यक होते. ही माहिती न दिल्याने नियमांचे उल्लंघन झालेले आहे.
४. अर्भकांची लिंगचाचणी करून ते मुलगा कि मुलगी होते, याचे अन्वेषण केले जाणार आहे.