नोंद
सातारा जिल्ह्याच्या सीमेतून पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ गेला आहे. या महामार्गावर जिल्ह्याच्या सीमेतच आनेवाडी आणि तासवडे असे २ पथकर नाके (टोल नाके) आहेत. दिवसभरात राज्यासह सातारा जिल्ह्यातील सहस्रोंच्या संख्येने वाहने या महामार्गावरून ये-जा करत असतात. सर्वांना पथकर भरावा लागतो. काही मासांपूर्वी सातारावासियांनी या पथकराच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते; मात्र शासनकर्त्यांनी या आंदोलनामध्ये हस्तक्षेप करत जनतेचे आंदोलन मोडीत काढले. नंतर पुन्हा सातारावासीय या सूत्रावर एकवटले नाहीतच ! कोल्हापूर येथील नागरिकांनी शहरातील, तर पुणे येथील नागरिकांनी जिल्ह्यातून जाणार्या महामार्गावरील पथकर तीव्र आंदोलन करून पूर्णत: रहित करून घेतले आहेत. यातून पथकर रकमेचे धोरण संपूर्ण राज्यात एकच का नाही ? हा प्रश्न नागरिकांना पडतो.
‘भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’च्या नियमानुसार पथकर नाक्यापासून २० किलोमीटर अंतराच्या आतील वाहनांना पथकर नाक्यावरून सतत ये-जा करावी लागत असेल, तर त्यांच्याकडून निश्चित पथकर न घेता वाहनधारकाच्या अनुमतीने प्रतिमास एक ठराविक रक्कम घेऊ शकतो. याच धर्तीवर वाहनधारक आणि प्राधिकरण यांच्यात सुवर्णमध्य म्हणून ‘मासिक पास’ ही संकल्पना पुढे आली. त्यानुसार २-३ वर्षांपासून ही योजना कार्यान्वित आहे. त्यानुसार वाहनचालक पथकर भरत आहेत. ज्या वाहनधारकांकडे वैयक्तिक कारणासाठी नोंदणीकृत वाहन आहे आणि ती व्यक्ती पथकर नाक्यापासून २० किलोमीटर अंतराच्या आत रहाते, अशा वाहनधारकांना ‘मासिक पास’ उपलब्ध करून दिला जातो. प्रतिवर्षी या ‘मासिक पास’ योजनेतील रकमेमध्ये पालट करण्यात येतात. सध्या हे मूल्य जिल्ह्यातील प्रतिपथकर नाका २८५ रुपये एवढे आहे.
पथकर भरण्याविषयीची सर्व स्थिती पाहिल्यास गत १५ वर्षांहून अधिक काळ पथकर भरून सातारावासीय त्रस्त झाले असून त्यांना या पथकरातून मुक्ती हवी आहे. सर्व समस्या पाहिल्यास कोल्हापूर आणि पुणे येथील नागरिकांप्रमाणे तीव्र आंदोलन करून नियम पालटण्यास भाग पाडणे बरोबर आहे का ? असे वाटते. नागरिकांना अयोग्य सवयी लावण्याऐवजी सरकारनेच यामध्ये लक्ष घालून सर्वांना एकच नियम करावा, ही अपेक्षा !
– श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा