पुरातत्व विभागाचे हिंदुकरण आवश्यक !

संपादकीय 

हिंदूंच्या ऐतिहासिक वास्तूंच्या इस्लामीकरणास सरकारचा पुरातत्व विभाग उत्तरदायी !

रायगड जिल्ह्यातील सरसगड आणि मानगड येथे अनधिकृत थडगे, तर हिराकोट येथे अवैध दर्गा असल्याचे निष्पन्न झाले आहे. कुलाबा दुर्गावरही अनधिकृत थडगे बांधल्याचे निष्पन्न झाले. या सर्वांमध्ये एक समान धागा म्हणजे ही अनधिकृत बांधकामे उभी रहात असतांना त्याकडे पुरातत्व विभागाने केलेले अक्षम्य दुर्लक्ष होय. पुरातत्व सर्वेक्षण विभागाची स्थापना वर्ष १८६१ मध्ये म्हणजे १६१ वर्षांपूर्वी झाली. हा विभाग केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येतो. राष्ट्रातील महत्त्वाच्या स्मारकांचे, पुरातन वास्तूंचे, तसेच अवशेषांचे संवर्धन करण्याचे दायित्व या विभागावर सोपवण्यात आले आहे. या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे तर सोडाच त्यांचे ‘हिरवेकरण’ होत असतांना पुरातत्व विभाग बघ्याची भूमिका घेत आहे, हे संतापजनक आहे. स्वतः या वास्तूंच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष करायचे; मात्र कुणी याविषयी तक्रार करून लक्ष वेधत असेल, तर त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करायचे, ही पुरातत्व विभागाची कार्यप्रणाली दिसते. महाराष्ट्रातील गड आणि दुर्ग यांचे सुशोभीकरण हा वेगळा विषय झाला; मात्र आहे ते जतन करणे आणि तेथे अनधिकृत बांधकाम होऊ न देणे, हेही पुरातत्व विभागाला जमत नसेल, तर हा विभाग काय कामाचा ? ज्या कारणासाठी एखादा विभाग स्थापन झाला असेल, त्याची ध्येयपूर्तीच होत नसेल, तर हा पांढरा हत्ती पोसायचा कशाला ? अर्थसंकल्पात या विभागासाठी १ सहस्र ४२ कोटींहून अधिक रुपयांची तरतूद केली गेली आहे. भारतातील ऐतिहासिक वास्तूंची संख्या पहाता त्यांच्या संवर्धनासाठी हा निधी अपुराच आहे; मात्र या निधीतून वास्तूंच्या रक्षणासाठी ‘किमान समान कार्यक्रम’ तरी राबवला जाऊ शकतो. पुरातत्व विभागाकडून तेही होत नाही. कॅगच्या एका अहवालानुसार भारतातील ३ सहस्र ६७८ वास्तू पुरातत्व विभागाच्या अखत्यारीखाली येतात; मात्र त्यांतील केवळ १ सहस्र ६५५ वास्तूंची नोंद पुरातत्व विभागाकडे आहे. त्याही पुढे जाऊन पुरातत्व विभागाकडे ‘त्याच्या अखत्यारीत किती वास्तू किंवा स्मारके आहेत ?’, त्याची अचूक नोंद नाही. त्यामुळे या वास्तूंच्या संवर्धनासाठी खासगी आस्थापनांना दायित्व द्यावे, असे ‘कॅग’च्या अहवालात म्हटले होते. यावरून पुरातत्व विभागाचा भोंगळ कारभार लक्षात येतो.

पुरातत्व विभागाची व्याप्ती मोठी !

जगातील सर्वांत जुनी संस्कृती म्हणजे हिंदु संस्कृती भारतात वास करते. युरोपीय खंडातील देश किंवा अमेरिका आदी देशांचा इतिहास हा काही सहस्रो वर्षांचा आहे. भारताला लाखो वर्षांचा इतिहास लाभला आहे. रामायण हे साधारण ५ ते ८ लाख वर्षांपूर्वी घडल्याचे म्हटले जाते. यावरून येथील वास्तू, धार्मिक स्थळे, मठ, मंदिरे ही किती जुनी असतील, याचा विचार आपण करू शकतो. त्यामुळे या सर्वांचे जतन करणे आणि त्याद्वारे भारताचा समृद्ध वारसा पुढील पिढीला सांगणे, याचे दायित्व पुरातत्व विभागाकडे आहे; मात्र हे दायित्व पार पाडण्यास पुरातत्व विभाग अल्प पडत आहे.

जागतिक स्तरावर विविध देशांमधील पुरातत्व विभाग तेथील ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करतांना दिसतात. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही त्यांच्याकडून होतो. भारतात या सर्वच गोष्टींचा वानवा आहे. त्याही पुढे जाऊन विदेशातील आणि भारतातील एखाद्या वास्तूचे जतन अन् संवर्धन यांमध्ये भेद आहे. भारतातील बहुतांश ऐतिहासिक वास्तूंशी हिंदूंच्या धार्मिक भावना जोडलेल्या आहेत. बहुतांश ऐतिहासिक स्थळे ही हिंदूंच्या अस्मितेची प्रतिके आहेत. त्यामुळे त्यांच्याशी श्रद्धा निगडित आहे. हे लक्षात घेता भारताच्या पुरातत्व विभागाची व्याप्ती मोठी आहे, हे आपल्या लक्षात येईल. येथे एखाद्या वास्तूचे केवळ जतन आणि संवर्धन अभिप्रेत नाही, तर त्याहून अधिक धार्मिक भावनांचाही यथोचित आदर होत आहे ना, ते पहाणे अभिप्रेत आहे. भारतात मात्र अनेक पुरातन आणि ऐतिहासिक मूर्तींची चोरी होते. नंतर एखादे मंत्री ऑस्ट्रेलिया किंवा अमेरिका येथे दौर्‍यावर जातात, तेव्हा तेथील सरकार त्यांच्या देशात चोरून आणलेल्या भारतातील मूर्ती संबंधित मंत्र्यांना परत देतात. वास्तविक एवढ्या पुरातन मूर्तींची तस्करी कशी होते ? पुरातत्व विभाग झोपलेला आहे का ? पुरातत्व विभाग या वास्तू किंवा स्थळ यांच्याकडे ‘वस्तू’ म्हणून पहातो. या उलट भारतातील बहुतांश हिंदु समाज त्याकडे श्रद्धेने पहातो. पुरातत्व विभागाच्या कामकाजावर ‘पाश्चात्त्य’ पद्धतीने कामकाज करण्याचे संस्कार झाल्यामुळे त्याच्याकडून तितक्या तळमळीने कृती होतांना दिसत नाही.

‘पुरातत्व हिंदुत्व विभाग’ हवा !

पुरातत्व विभागावर साम्यवादी विचारसरणीच्या लोकांचे नियंत्रण होते. त्यामुळे भारतातील ऐतिहासिक वास्तूंची अतोनात हानी झाली. सध्याच्या पुरातत्व विभागाच्या धोरणांनुसार भारतातील वास्तूंचे केवळ संवर्धन होते; मात्र त्याद्वारे खरा इतिहास सांगितला जात नाही. याचे उदाहरण म्हणजे देहली येथील कुतुबमिनार हा विष्णुस्तंभ आहे, तर ताजमहाल हे हिंदूंचे धार्मिक स्थळ आहे. ‘या वास्तू हिंदूंच्या आहेत’, हा सत्य इतिहास सांगण्याचे धारिष्ट्य पुरातत्व विभाग दाखवत नाही. या हिंदूंच्या वास्तू आहेत, हे सांगणारे अनेक पुरावे सध्या उपलब्ध आहेत; मात्र हे पुरावे दाबले जातात. याचे प्रमुख कारण म्हणजे या वास्तूंचा समृद्ध इतिहास जो हिंदूंशी निगडित आहे, तो पुढे यावा, असे या विभागाला वाटत नाही.

सध्या भारताला विश्वगुरु बनवण्याविषयी हालचाली चालू आहेत. केवळ विकास करून, आधुनिकीकरणावर भर देऊन भारत विश्वगुरु होणार नाही. त्यासाठी भारतातील सर्वच क्षेत्रांचे हिंदुकरण होणे आवश्यक आहे. त्याचाच एक भाग म्हणून हिंदूंचा दैदीप्यमान इतिहास सांगणार्‍या वास्तूंचे विविध कारणांमुळे ‘झाकलेले’ हिंदुत्व जागृत करणे आवश्यक आहे; कारण या वास्तू म्हणजे हिंदूंच्या अस्मितेची प्रतिके आहेत. या वास्तूंचे हिंदुत्व जागृत करायचे असेल, तर प्रथम त्याचे दायित्व ज्या विभागावर सोपवले आहे, त्याचे हिंदुकरण होणे आवश्यक आहे. हे दायित्व सरकारने पार पाडणे अपेक्षित आहे !