मुंबई जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचे वर्चस्व

मुंबई – मुंबई जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव होऊन महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई जिल्हा बँकेवरचे भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांचे वर्चस्व संपवून महाविकास आघाडीने वर्चस्व निर्माण केले आहे. महाविकास आघाडीचे सिद्धार्थ कांबळे यांना ११, तर भाजपच्या प्रसाद लाड यांना ९ मते मिळाली आहेत. एका वर्षानंतर अध्यक्षपद शिवसेनेला देण्याचे ठरले आहे.

उपाध्यक्षपदाच्या दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्यानंतर चिठ्ठी टाकून निवड करण्यात आली, यामध्ये भाजपचे विठ्ठल भोसले विजयी झाले आहेत.

या निवडणुकीवर प्रतिक्रिया देतांना प्रवीण दरेकर म्हणाले की, भाजपकडे १० मते होती, विष्णू भुंबरे फुटले, त्यामुळे महाविकास आघाडीला ११ मते मिळाली. ही निवडणूक जिंकण्यासाठी राज्य सरकारने दबाव आणला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी प्रत्यक्ष लक्ष घातल्याने मोठा दबाव निर्माण केला. सत्तेचा दुरुपयोग करून ही निवडणूक महाविकास आघाडीने जिंकली आहे.