फिलिपीन्स विकत घेणार भारताची ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्रे !

  • चीनला शह देण्याचा फिलिपीन्सचा प्रयत्न !

  • व्हिएतनामसह अन्यही आशियाई देशांनीही दाखवली रुची !

मनीला (फिलिपींस) – दक्षिण चीन सागरापासून लडाखपर्यंत स्वत:ची भूमी असल्याचा दावा करणार्‍या विस्तारवादी चिनी ड्रॅगनला मोठा फटका बसला आहे. चीनच्या दादागिरीमुळे व्यथित दक्षिण पूर्वी आशियाई देश फिलिपीन्सने भारताचे जगातील सर्वांत गतीमान ‘सुपरसोनिक एंटी-शिप क्रूज’ क्षेपणास्त्र ‘ब्रह्मोस’ विकत घेण्यास स्वीकृती दिली आहे. साधारण ३७ कोटी ४० लाख अमेरिकी डॉलर्समध्ये दोन्ही देशांमध्ये हा व्यवहार झाला आहे. भारत आणि रशिया यांनी संयुक्तिक रूपाने बनवलेल्या ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्रांची ही पहिली विदेशी मागणी आहे.

१. फिलिपीन्स हा अमेरिकेचा सहयोगी देश आहे. चीनच्या विरोधातील युद्धाची सिद्धता करण्यासाठी त्याने भारतावर विश्‍वास प्रकट केला आहे.

२. फिलिपीन्स गेल्या काही वर्षांपासून दक्षिण चीन सागरामध्ये चीनच्या वाढत्या कुरापतींना अटकाव करण्यासाठी त्याचे नौदल सक्षम करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

३. चीनचा शेजारी देश व्हिएतनामही लवकरच ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्रांसाठी भारताशी व्यवहार करणार आहे. या दोन्ही देशांमध्ये यावर चर्चाही चालू झाली आहे. तसेच इंडोनेशियासह अन्य अनेक देशांनीही ही क्षेपणास्त्रे विकत घेण्याविषयी रुची दाखवली आहे.

‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राचे महत्त्व !

ब्रह्मोस क्षेपणास्त्र पाणबुडी, युद्धनौका आणि लढाऊ विमाने आदींवर बसवून ती डागली जाऊ शकतात. हे क्षेपणास्त्र आवाजाच्या गतीपेक्षा तीन पटींनी अधिक गतीने प्रवास करते. हे क्षेपणास्त्र २९० किमीपर्यंत मारा करते.