देहलीत कोरोनाला बळी पडलेल्यांपैकी ७५ टक्के लोक लस न घेतलेले !

देहली – देशात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस गतीने वाढत आहे. मागील २४ घंट्यांत देशात २ लाख ६४ सहस्रांहून अधिक रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. देशातील कोरोना संक्रमणाचा दर आता १४.७८ टक्क्यांहून अधिक झाला आहे. देहली येथे अलीकडच्या काळात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या ७५ टक्के रुग्णांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली नसल्याचेही समोर आले आहे.

देशात १५ ते १८ वर्षे या वयोगटातील मुलांसाठी राबवण्यात येत असलेल्या लसीकरण अभियानाला यश मिळत आहे. ३ जानेवारीला हे लसीकरण चालू झाले असून ११ दिवसांत ४२ टक्के म्हणजे ३ कोटी १४ लाख मुलांना कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे. जानेवारी मासात ८० ते ८५ टक्के मुलांना लसीकरणाचा पहिला डोस देण्याचे केंद्रशासनाचे ध्येय आहे.

अमेरिकेत कोरोनाचा हाहा:कार : सैन्याला साहाय्यासाठी पाचारण !

कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये पायाभूत वैद्यकीय सुविधा पूर्णतः कोलमडल्या आहेत. १३ जानेवारीला तेथे १ लाख ४२ सहस्रांहून अधिक रुग्ण सापडले. कोरोनाची अनियंत्रित स्थिती लक्षात घेऊन तेथील राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मिशिगन, न्यू जर्सी, न्यू मेक्सिको, न्यूयॉर्क, ओहायो आणि रॉड आयलंड येथील रुग्णालयांत सहाय्यासाठी सैन्य पाठवले आहे.