‘इस्रो’च्या ‘गगनयान’ प्रकल्पाच्या अंतर्गत केलेल्या महत्त्वपूर्ण चाचणीत यश !

बेंगळुरू (कर्नाटक) – भारताचा बहुचर्चित ‘गगनयान’ मोहीम वर्ष २०२३ मध्ये राबवली जाणार आहे. या मोहिमेच्या अंतर्गत भारताचे ३ अंतराळवीर ७ दिवस अंतराळात रहाणार आहेत. ही मोहीम यशस्वी झाल्यास भारत असे करणारा जगातील चौथा देश ठरणार आहे. भारताला या दिशेने एक महत्त्वपूर्ण यश मिळाले. ‘इस्रो’ने भारताच्या प्रथम ‘ह्यूमन स्पेस फलाइट मिशन’मध्ये उपयोगात आणल्या जाणार्‍या ‘जी.एस्.एल्.व्ही. रॉकेट’च्या ‘क्रायोजेनिक इंजन’ची यशस्वी चाचणी केली. तामिळनाडूच्या महेंद्रगिरीमध्ये गगनयान कार्यक्रमाच्या अंतर्गत ही चाचणी ७२० सेकंदांसाठी करण्यात आली. यासंदर्भात इस्रोने सांगितले की, अधिक कालावधीसाठी करण्यात आलेले हे परीक्षण ‘मानव अंतरिक्ष कार्यक्रम – गगनयान’साठी मोठे यश आहे. ही या प्रकल्पाच्या विश्‍वासार्हतेवर शिक्कामोर्तब करते.

इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी सांगितले की, भारताची महत्त्वाकांक्षी ‘गगनयान योजने’चे सर्व टप्पे हे भारताच्या ७६ व्या स्वातंत्र्यदिनाच्या म्हणजे १५ ऑगस्ट २०२२ च्या आधी पूर्ण होतील. के. सिवन १४ जनवरीला निवृत्त होत आहेत, तर प्रसिद्ध वैज्ञानिक एस्. सोमनाथ आता इस्रोचे नवे अध्यक्ष असणार आहेत.