सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंतच्या सर्व शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद

शाळा बंद असल्या, तरी ‘ऑनलाईन’ शिक्षण चालू रहाणार

शाळा बंद . . .

सिंधुदुर्ग (जि.मा.का) – जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गामध्ये, तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या (शासकीय आणि खासगी) आणि सर्व माध्यमांच्या इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंतच्या सर्व शाळा १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

या अनुषंगाने शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. मुश्ताक शेख यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी, प्राचार्य, तसेच मुख्याध्यापक यांना पुढीलप्रमाणे सूचना दिल्या आहेत – 

१. शाळा बंद असल्या, तरी शाळांमधील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी नियमित शालेय कामकाजाच्या वेळेत शाळेत पूर्ण वेळ उपस्थित राहून विद्यार्थ्यांना ‘ऑनलाईन’ अध्यापन करायचे आहे. मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी वेळोवेळी विद्यार्थी आणि पालक यांच्याशी सुसंवाद साधावा आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी प्रयत्न करावेत.

२. ‘ऑनलाईन’ अध्यापन करणे शक्य नसेल तेथे (भ्रमणभाषसाठी ‘रेंज’ नसलेल्या ठिकाणी) कोरोना साथ रोगाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने दिलेल्या कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करून गृहभेटीद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांच्या गृहभेटीला जातांना शाळेच्या नोंदवहीत (रजिस्टरमध्ये) सुस्पष्ट नोंद करावी.

‘ऑनलाईन’ शिक्षण चालू . . .

३. मुख्याध्यापकांनी गृहभेटीचे वस्तूनिष्ठ नियोजन करावे. शाळांतील शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’मध्ये मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विषयतज्ञ यांना समाविष्ट  करून घ्यावे. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अभ्यासाविषयी या सर्वांनी पाठपुरावा करावा.

४. विविध शैक्षणिक मंडळांकडून (बोर्डाकडून) १० वी आणि १२ वी या इयत्तांच्या विद्यार्थ्यांसाठी राबवायचे उपक्रम शाळा बंद असल्या तरी ‘ऑनलाईन’ पद्धतीने चालू असणार आहेत. तसेच शालेय वेळेत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी १०० टक्के उपस्थित राहून प्रशासकीय कामकाज, अध्ययन, अध्यापन आणि लसीकरण यांसाठी शाळेत उपस्थित रहाणे अनिवार्य राहील. यांसह अन्य सूचना देण्यात आल्या आहेत.