गोव्यात दिवसभरात २ सहस्र ४७६ कोरोनाबाधित : ८ मासांतील नवीन उच्चांक

पणजी, ११ जानेवारी (वार्ता.) – गोव्यात ११ जानेवारी या दिवशी कोरोनाबाधित २ सहस्र ४७६ नवीन रुग्ण आढळले आहेत. मागील ८ मासांत एकाच दिवशी एवढ्या प्रमाणावर कोरोनाबाधित नवीन रुग्ण आढळण्याचा हा एक नवीन उच्चांक आहे. राज्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या आता १२ सहस्र १९ झाली आहे. कोरोनाच्या चाचणीच्या तुलनेत रुग्ण आढळण्याचे प्रमाण ३०.३६ टक्के आहे. ११ जानेवारी या दिवशी कोरोनाबाधित ४ रुग्णांचे निधन झाले आणि यामुळे कोरोनाचा संसर्ग झाल्याने मृत्यू पावलेल्यांची राज्यातीलआतापर्यंतची एकूण संख्या ३ सहस्र ५३७ झाली आहे.
उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर कोरोनाबाधित झाले आहेत. त्यांना उपचारासाठी मणीपाल रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

शासनाचे कोरोना चाचणीच्या दर आकारणीवर निर्बंध

‘आर्. टी. पी.सी.आर्.’ आणि ‘रॅपिड अँटीजन’ चाचणीसाठी सर्वाधिक अनुक्रमे ५०० आणि २५० रुपये दर निर्धारित

पणजी – शासनाने कोरोना चाचणीच्या दर आकारणीवर निर्बंध घातले आहेत. कोरोनासंबंधी पारंपरिक ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी आणि ‘रॅपिड अँटीजन’ चाचणी  (‘लेटरल फ्लो इम्यून क्रोमेटोग्राफी’च्या साहाय्याने केलेली चाचणी) यांसाठी सर्वाधिक अनुक्रमे ५०० आणि २५० रुपये दर निर्धारित करण्यात आले आहेत. आरोग्य खात्याच्या उपसचिव गौतमी पार्मेकर यांनी एका आदेशाद्वारे हे दर निर्धारित केले आहेत; मात्र विदेशातून येणार्‍या प्रवाशांसाठी ‘रॅपिड आर्. टी. पी.सी.आर्.’ चाचणी करायला नेहमीप्रमाणे १ सहस्र ५०० रुपये आकारण्यात येणार आहेत.