नवी देहली – वर्ष २०१६ मध्ये जागतिक स्तरावर प्रथम राहिलेल्या प्रसिद्ध बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांच्यावर तमिळनाडूचे अभिनेते सिद्धार्थ सूर्यनारायण यांनी अश्लील आणि लिंगभेदवादी ट्वीट केली असून त्यांच्याविरोधात देहली येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नेहवाल यांनी ५ जानेवारी या दिवशी पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसंदर्भात घडलेल्या गंभीर घटनेवरून ट्वीट करत आपली संवेदना प्रकट केली होती. त्यावर प्रतिसाद देतांना सिद्धार्थ यांनी नेहवाल यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली. सायना यांनी सिद्धार्थ यांच्या ट्वीटविषयी नापसंती व्यक्त केली आहे. सिद्धार्थ यांच्या विरोधात सामाजिक माध्यमांवरून विरोध चालू झाल्यावर मात्र त्यांनी ‘माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आणि वाद वाढवण्यात आला’, अशा प्रकारे सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची स्वत:हून नोंद घेत अभिनेते सिद्धार्थ यांना नोटीस पाठवली आहे. तसेच त्यांचे ट्विटर खाते बंद करण्याचे आवाहन सरकारकडे केले आहे.