सावंतवाडी – इन्सुली गावातून तिलारी धरणाचे पाणी प्रवाहित करणार्या कालव्याचे काम गेली कित्येक वर्षे बंद होते. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जात होते. अखेर इन्सुली ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर यांनी आंदोलन केल्यानंतर ७ जानेवारीपासून कालव्याच्या कामाला ओटवणे येथे प्रारंभ करण्यात आला.
‘तिलारी धरणाच्या ओटवणे येथील कालव्याचे ११० मीटर अंतराचे काम न केल्यामुळे पुढे असलेल्या निगुडे, इन्सुली आदी गावांना पाणीपुरवठा होत नाही. गेली ३ ते ४ वर्षे ही परिस्थिती आहे. वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही नोंद घेतली जात नाही. संबंधित ठेकेदाराने कालव्याचा ठेका घेतला आहे; मात्र त्याच्याकडून काम केले जात नाही’, असा ग्रामस्थांचा आरोप असल्याने नाटेकर यांनी हे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे, यासाठी आंदोलन केले होते. (ठेकेदाराला ठेका देऊनही ३-४ वर्षे काम चालू न होणे आणि त्यासाठी आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! यामुळे प्रशासन अस्तित्वात आहे कि नाही, असा प्रश्न पडतो ! – संपादक)