एका फ्रेंच लेखकाचा हिंदु धर्माविषयी जेवढा अभ्यास आहे, तेवढा कुणाचाही नाही, हेच यावरून दिसून येते. जे एका फ्रेंच लेखकाच्या लक्षात येते, ते हिंदूंच्या लक्षात न येणे, हे लज्जास्पद ! – संपादक
फ्रेंच लेखक फ्रान्सुआ गोतिए यांनी ‘हिंदू स्वत:च्या धर्मातील व्याख्या समजावतांना इंग्रजी भाषेचा वापर करतात ?’ या विषयावर त्यांच्या ‘फेसबूक पेज’वर १ जून २०१७ या दिवशी पुढीलप्रमाणे सूत्रे प्रसिद्ध केली आहेत. ‘हिंदूंनी इंग्रजी भाषेचा वापर करतांना पुढील काही विशिष्ट शब्दांसाठी अयोग्य इंग्रजी शब्दांचा वापर करू नये’, असे आवाहन केले आहे.
१. ‘गॉड फिअरिंग’ हा शब्दप्रयोग वापरणे कृपा करून बंद करा. हिंदूंना देवाची कधीही भीती वाटत नाही. आमच्यासाठी देव सर्वव्यापी आहे आणि आम्ही देवाचे अंश आहोत. आम्हाला देवाची भीती वाटायला, तो आमच्यासाठी वेगळा नाही. आम्ही एकच आहोत.
२. एखाद्याचे निधन झाल्यास कृपा करून ‘आर्.आय.पी.’ (रेस्ट इन पीस) हे विधान वापरू नका. ‘ॐ शांती’, ‘सद्गती’ किंवा ‘या आत्म्याला मोक्ष किंवा सद्गती किंवा उत्तम लोक प्राप्त होऊ दे’, असे शब्दप्रयोग करा. हिंदु धर्मामध्ये ‘सोल’ (Soul) ही संकल्पना नाही किंवा ‘रेस्टींग’ ही संकल्पनाही नाही. ‘सोल’ या शब्दासाठी ‘आत्मा’ आणि ‘जीव’ हे प्रतिशब्द आहेत.
३. ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या ऐतिहासिक महाकाव्यांना ‘मायथॉलॉजी’ हा शब्द वापरू नका. श्रीराम आणि श्रीकृष्ण हे ऐतिहासिक नायक आहेत, पौराणिक कथांमधील पात्रे नाहीत.
४. मूर्तीपूजेविषयी कृपा करून अपराधीपणाचा भाव ठेवू नका आणि ‘ते केवळ ‘प्रतिकात्मक’ आहे’, असेही म्हणू नका. सर्वच धर्मांमध्ये वेगवेगळ्या प्रकारातील मूर्तीपूजाच असतात. उदा. क्रॉस, शब्द, अक्षरे किंवा मार्गदर्शन इत्यादी. तसेच आपल्या देवतांच्या शिल्पाकृतींचा उल्लेख करतांना ‘आयडॉल्स’, ‘स्टॅच्यूज’ किंवा ‘इमेजेस’ आदी शब्द वापरणे बंद करा. त्यासाठी ‘मूर्ती’ किंवा ‘विग्रह’ हे शब्द वापरा. जर कर्म, योग, गुरु आणि मंत्र हे शब्द मुख्य प्रवाहामध्ये सर्रास वापरले जाऊ शकतात, तर ‘मूर्ती’ किंवा ‘विग्रह’ हे शब्द का वापरले जाऊ शकत नाहीत ?
५. श्रीगणेश आणि श्री हनुमान यांना अनुक्रमे ‘एलिफंट गॉड’ आणि ‘मंकी गॉड’ हे शब्द वापरू नका. केवळ ‘श्रीगणेश’ आणि ‘श्री हनुमान’ असे लिहा.
६. आमच्या मंदिराचा ‘प्रेअर हॉल’ असा उल्लेख करू नका. मंदिर हे ‘देवालय’ (देवाचे निवासस्थान) आहे, ‘प्रार्थनालय’ (प्रेअर हॉल) नव्हे !
७. आपल्या मुलांना वाढदिवसाच्या निमित्ताने केकवर लावलेल्या मेणबत्या विझवण्यास सांगून त्यांचा ‘अंधःकारमय वाढदिवस’ साजरा करू नका. अग्निदेवतेवर थुंकू नका. त्याऐवजी त्यांना दीप प्रज्वलित करून पुढील प्रार्थना करण्यास सांगा, ‘तमसो मा ज्योतिर्गमय । म्हणजे हे अग्निदेवते, मला अंधःकाराकडून प्रकाशाकडे ने.’ याचा आपल्या मनामध्ये खोलवर परिणाम होत असतो.
८. हिंदूंसाठी सर्वच दैवी आहे. ‘चर्च विरुद्ध स्टेट’ किंवा ‘सायन्स विरुद्ध रिलिजन’ या संकल्पना मांडणार्या ख्रिस्ती मिशनरी आणि युरोपीय यांनी ‘स्पिरिच्युॲलिटी’ अन् ‘मटेरिॲलिझम’ हे शब्द भारतात आणले. याउलट भारतामध्ये ‘ऋषि हे शास्त्रज्ञ आणि सनातन धर्माचा पाया विज्ञानावर आधारलेला आहे.’
९. ‘सिन’ हा शब्द ‘पाप’ या व्याख्येसाठी वापरू नका. आपल्याकडे केवळ ‘धर्म’ आणि ‘अधर्म’ हे शब्द आहेत. अधर्मातून पापाची निर्मिती झाली आहे.
१०. ‘ध्याना’साठी ‘मेडिटेशन’ आणि ‘प्राणायाम’साठी ‘ब्रीदिंग एक्सर्साइझ’ या शब्दांचा वापर कृपया करू नका. त्यातून चुकीचा अर्थबोध होतो. त्यासाठी मूळ शब्दांचाच वापर करावा.
नेहमी लक्षात ठेवा, ‘जे स्वत:च्या संस्कृतीचा आदर करतात, त्यांचा संपूर्ण जग आदर करते.’
फ्रान्सुआ गोतिए यांच्या वरील लिखाणावर एका वाचकाने दिलेला अभिप्रायफ्रान्सुआ गोतिए यांनी लिहिलेली सूत्रे वाचून आपल्यातील बहुतेक जणांपेक्षा त्यांना हिंदु धर्म अधिक ठाऊक आहे, हे लक्षात येते. – एक वाचक |