‘सिख फॉर जस्टिस’ने घेतले पंतप्रधान मोदी यांचा वाहन ताफा अडवण्याचे दायित्व !

बंदी घातलेल्या आणि अमेरिकेतून चालवण्यात येणार्‍या खलिस्तानी संघटनेकडून भारतात अन् तेही पंतप्रधान मोदी यांचा ताफा अडवण्याचे धाडस करतेच कसे ? सुरक्षायंत्रणा झोपलेल्या आहेत का ? कि त्या खलिस्तान्यांना फितूर झाल्या आहेत ? – संपादक

डावीकडे एस्.एफ्.जे.चा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू आणि पंतप्रधान नरेद्र मोदी

नवी देहली – पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाहन ताफा शेतकरी आंदोलनाने अडवल्याच्या प्रकरणाचे दायित्व बंदी घालण्यात आलेल्या ‘सिख फॉर जस्टिस’ (एस्.एफ्.जे.) या खलिस्तानी आतंकवादी संघटनेने घेतले आहे. तसेच या संघटनेने दूरभाष करून सर्वोच्च न्यायालयाच्या एका अधिवक्त्याला ‘या प्रकरणाच्या बाजूने तुम्ही न्यायालयात लढू नये’, अशी धमकीही दिली आहे. या संघटनेने अनुमाने ५० अधिवक्त्यांना दूरभाष करून अशा प्रकारच्या धमक्या दिल्या आहेत. अधिवक्ता राहुल कौशिक यांनी सांगितले की, त्यांना दूरभाषवरून धमकी देण्यात आली आहे. त्यांनी याची माहिती सर्वोच्च न्यायालयाचे सरचिटणीस यांना दिली आहे. ब्रिटनमधून हे दूरभाष करण्यात आले आहेत. एस्.एफ्.जे.चा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू आहे.

१. धमकी देणारे सांगत आहेत की, वर्ष १९८४ च्या शिखांच्या हत्याकांडातील पीडितांना अद्याप न्याय मिळालेला नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांचे सुरक्षेचे प्रकरण न्यायालयात चालू नये. (हे सत्य आहे की, वर्ष १९८४ मधील शिखांच्या हत्याकांडाच्या प्रकरणी अपेक्षित असा न्याय पीडितांना मिळालेला नाही. याला आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते, विशेषतः काँग्रेस उत्तरदायी आहे ! – संपादक)

२. या धमक्यांविषयी निवृत्त कर्नल आर्.एस्.एन्. सिंह म्हणाले की, या धमक्यांना कमी लेखण्यात येऊ नये. खलिस्तानच्या संदर्भातील प्रकरण अधिक गंभीर झाले आहे.