१. परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत सेवेसाठी गेल्यावर महामृत्यूयोगामुळे ते झोपून असल्याचे दिसणे, सेवा संपल्यावर ते उठून पलंगावर बसलेले दिसणे अन् त्यांना पाहून स्वामी समर्थ आणि श्री गजानन महाराज यांची आठवण होऊन भावजागृती होणे
‘१९.४.२०२० या दिवशी प.पू. डॉक्टरांच्या खोलीत एका सेवेसाठी गेलो असता प.पू. डॉक्टरांची प्रकृती चांगली नसल्याचे लक्षात आले. ते झोपून होते. (त्यांचा महामृत्यूयोग चालू असल्याचे नंतर आठवले.) माझी सेवा पूर्ण होईपर्यंत ते उठून पलंगावरच बसले होते. त्या वेळी प.पू. डॉक्टरांना समोरून पाहिले असता, मला स्वामी समर्थ किंवा श्री गजानन महाराज यांची आठवण आली. सर्वाेच्च पातळीच्या या संतांसारखीच शरीरयष्टीनि त्यांच्यासम तेज असलेल्या गुरुमूर्तीला पाहून माझा भाव जागृत झाला. तेव्हा ‘प.पू. डॉक्टरांच्या रूपाने देवाने आपल्याला असे संत किंबहुना महर्षीनी सांगितल्याप्रमाणे अवतारी ‘गुरु’ म्हणून दिले आहेत’, असा विचार येऊन पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.
२. प.पू. गुरुदेवांच्या खोलीत आलेल्या अनुभूतीचा दुसर्या दिवशी विचार करतांना तो प्रसंग धूसर दिसणे आणि ‘त्यांच्या महामृत्यूयोगामुळे तो प्रसंग धूसर दिसला असेल’, असे वाटणे
वरील अनुभूतीचा दुसर्या दिवशी विचार करत असतांना माझ्या मनात हा सर्व घटनाक्रम धूसर दिसत होता. प.पू. गुरुदेवांच्या खोलीत एवढे चैतन्य आहे की, त्याचा विचार करता अशा प्रकारे मनाला कधीच जाणवत नाही; परंतु या वेळी मात्र तसे जाणवले. तेव्हा माझ्या मनात पुढील विचार आले, ‘२० एप्रिल २०२० या दिवशी रामनाथी आश्रमात अनेक वर्षे पूर्णवेळ साधना करणार्या सौ. सुजाता देवदत्त कुलकर्णीकाकूंचे निधन झाले होते. त्या वेळी प.पू. डॉक्टरांच्या खोलीत सेवेला जाण्याच्या आधी काकूंच्या पार्थिवाचे दर्शन घ्यायला मी गेलो होतो, तसेच त्या दिवशी माझे नामजपादी उपायही झाले नव्हते. या दोन कारणांमुळे वर सांगितल्यानुसार मनाला प.पू. डॉक्टरांच्या खोलीतील प्रसंग धूसर दिसत होता कि ‘त्यांच्या महामृत्यूयोगामुळे खोलीतील वातावरणात वेगळ्या प्रकारे पालट झाला होता’, हे माझ्या लक्षात आले नाही. ‘महामृत्यूयोगामुळे तेथील वातावरणामध्ये पालट झाला असेल आणि मनाच्या स्तरावर संपूर्ण प्रसंग धूसर दिसत असल्यामागील कारणही तेच असेल’, असे आता जाणवते.
३. साधकाला आलेल्या अनुभूतीची त्याला पुन्हा आवश्यकता असेल, तरच ईश्वर त्या अनुभूतीचे पुन्हा स्मरण करून देत असणे
प्रश्न : वरील अनुभूतीमध्ये जे जाणवले ते बरोबर आहे का ?
उत्तर : आदल्या दिवशी आलेल्या अनुभूतीतील दृश्य दुसर्या दिवशी त्या अनुभूतीचा विचार करतांना धूसर दिसण्यामागे ‘ती अनुभूती पुन्हा दृश्य स्वरूपात दिसण्याची आवश्यकता नसणे, तसेच ती अनुभूती विस्मरणात जाणे’, ही कारणे आहेत. ईश्वर आवश्यक असल्यासच त्या अनुभूतीचे स्मरण पुन्हा करून देतो, नाहीतर नाही. – (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, (३०.५.२०२०)
– श्री. विक्रम डोंगरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.५.२०२०)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |