मी खरा मुख्य सूत्रधार आहे; उगाच निष्पाप तरुणांना त्रास दिलात, तर ‘बुली बाई २.०’ आणेन !

  • ‘बुली बाई’ॲप प्रकरण

  • ट्विटरवरून एका व्यक्तीची पोलिसांना धमकी !

मुंबई – ‘बुली बाई ॲप’च्या माध्यमातून मुसलमान महिलांची अपर्कीती केल्याप्रकरणी आतापर्यंत ४ जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई सायबर पोलिसांनी तिघांना अटक केली असून देहली पोलिसांनी आसाममधून नीरज बिष्णोई नावाच्या तरुणाला अटक केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून एका व्यक्तीने पोलिसांना खुले आव्हान देतांना म्हटले आहे की, या प्रकरणाचा मी खरा मुख्य सूत्रधार आहे; उगाच निष्पाप तरुणांना त्रास देऊ नका; अन्यथा ‘बुली बाई २.०’ आणेन. (देशातील कायद्याचा धाक नसल्याचे लक्षण ! – संपादक) हा व्यक्ती नेपाळ येथील असल्याचा संशय आहे. या प्रकरणी मुख्य सूत्रधाराला अटक करण्यासाठी मुंबई पोलीस देहलीला गेले होते; मात्र त्यापूर्वीच देहली पोलिसांनी त्याला अटक केली.

मुंबई पोलिसांनी आतापर्यंत श्वेता सिंह, मयंक रावत आणि विशाल झा या तिघांना अटक केली आहे. हे सर्व आरोपी समाजमाध्यमांवर एकमेकांच्या संपर्कात होते. धमकी देणार्‍या व्यक्तीने स्वतःचे खरे नाव, पासवर्ड आणि ॲप सिद्ध करण्यासाठी वापरण्यात आलेल्या ‘सोर्स कोड’ देण्याची सिद्धता दर्शवली आहे. ‘तुम्ही चुकीच्या व्यक्तीला अटक केली आहे. मुंबई पोलीस मी ‘बुली बाई’ ॲपचा खरा निर्माता आहे. तुम्ही अटक केलेले ते दोघे निर्दोष असून त्यांचा याच्याशी काही संबंध नाही. त्यांना तात्काळ सोडा’, असे त्याने स्वतःच्या ट्विटर हँडलवर म्हटले आहे.  आरोपी विशालकुमार झा याने गुन्ह्यांत ६ ट्विटर, २ इन्स्टाग्राम आणि ७ जिमेल खात्यांचा वापर केला आहे.