‘मोदीं’च्या सुरक्षेतील अक्षम्य त्रुटी !

संपादकीय

जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या पंतप्रधानांच्या सुरक्षाव्यवस्थेत अक्षम्य त्रुटी राहिल्याने ५ जानेवारी २०२२ हा दिवस भारतासाठी अत्यंत भयावह सिद्ध होऊ शकला असता. सुदैवाने तसे झाले नाही ! पंतप्रधान मोदी यांच्या पंजाब राज्यातील फिरोजपूर येथील दौर्‍याच्या वेळची ही घटना ! भटिंडा विमानतळावरून फिरोजपूरच्या हुसैनीवाला या पाकच्या सीमेला लागून असलेल्या गावाकडे एका कार्यक्रमासाठी जात असतांना तो रस्ता अडवून काही शेतकरी आंदोलन करत असल्याने पंतप्रधानांच्या ताफ्याला तब्बल २० मिनिटे एका उड्डाणपुलावर खोळंबून रहावे लागले. या कालावधीत काहीही घडू शकले असते. अराजकाची बिजे असलेल्या पंजाबात खलिस्तानवाद्यांनी पुन्हा एकदा हैदोस घालायला आरंभ केला आहे. गेल्या वर्षभरापासून देहली, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र, तसेच पंजाबात केंद्र सरकारच्या ३ नूतन कृषी कायद्यांना विरोध करतांना अराजकाची आणि देशद्रोहाची ही बिजे उभ्या भारताने पाहिली. आंदोलनात शेतकरी अल्प आणि खलिस्तानवादी अन् जिहादी हेच अधिक असल्याचे समोर येत गेले. जवळपास २ वर्षे चाललेल्या या खरेतर ‘देशविघातक’ आणि ‘शेतकरीद्रोही’ आंदोलनाचा परिणाम इतका आहे की, शेवटी केंद्राला शेतकर्‍यांच्या हितासाठी असलेले हे ३ कायदे मागे घ्यावे लागले. त्यामुळे शेतकर्‍यांची समस्या ही तशीच राहिली, हे त्यांचे आणि भारताचे दुर्दैव ! या घटनाक्रमातून कॅनडा, अमेरिका, युनायटेड किंगडम् ते शेजारील जिहादी पाकिस्तान या राष्ट्रांचे छुपे समर्थन असलेल्या खलिस्तानवाद्यांची मजल कुठेपर्यंत आहे ? हे लक्षात आले. पंतप्रधानांच्या सुरक्षाव्यवस्थेमध्ये राहिलेली त्रुटी पाहून वर्ष १९९५ मधील घटनेचा उल्लेख होणे आवश्यक वाटतो. पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री बियांत सिंह यांची ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ या खलिस्तानी संघटनेच्या एका आतंकवाद्याने आत्मघाती आक्रमणामध्ये हत्या केली होती. गेल्याच मासात ८ डिसेंबर २०२१ या दिवशी भारताचे पहिले सी.डी.एस्. (‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ म्हणजे तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख) यांचे एका हेलिकॉप्टरच्या अपघातात दु:खद निधन झाले. देशावर कोसळलेल्या या भयावह घटनेला अजून एक मासही पूर्ण झालेला नसतांना पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेमध्ये झालेला गाफीलपणा कोणत्याही राष्ट्रप्रेमी नागरिकाच्या मनातील काळजी वाढवणारा ठरला आहे. त्यात आता उभी ठाकलेली पंजाब राज्यातील विधानसभेची निवडणूक ! या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या ताफ्यासमोर अशा प्रकारे नामुष्की ओढवणे, ही आधुनिक भारताच्या इतिहासातील बहुदा पहिली घटना असेल !

जिहादी पाकचा हात ?

पंतप्रधानांच्या सुरक्षायंत्रणेतील त्रुटीला केवळ खलिस्तान्यांच्या आक्रमणाची झालर नव्हे, तर जिहादी पाकिस्तानच्या आक्रमणाची शक्यता असल्याचेही नाकारता येणार नाही. पंतप्रधान ज्या ठिकाणी जाणार होते, तो भाग पाकिस्तानपासून अवघ्या १० किमी अंतरावरील ! पंजाब राज्यात गेल्या २ वर्षांत राहिलेल्या सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी, तसेच पंजाबच्या निवडणुका जवळ आल्यापासून राज्यात घडलेला बाँबस्फोट, ईशनिंदेचा आरोप होऊन दोन लोकांची झालेली जमाव हत्या आणि एवढेच नाही, तर गेल्या काही दिवसांपासून पंजाबच्या भूमीवर पाकिस्तानी ‘ड्रोन्स’चा वाढलेला वावर हे आधीच चिंतेचे विषय बनले आहेत. एका प्रसंगी तर एका ड्रोनने भारतीय भूमीवर काही शस्त्रास्त्रे टाकल्याची घटनाही समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर ५ जानेवारीला घडलेल्या घटनेमध्ये खलिस्तानी आणि जिहादी शक्ती यांनी हातात हात घालून काही अनर्थ घडवला असता, तर त्याचे दायित्व कुणाचे होते ? याचा विचार व्हायला हवा ! त्यामुळेच ‘सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी अस्वीकारार्ह असून त्याचे उत्तरदायित्व निश्चित केले जाईल’, असे गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान मोदी आणि पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी

अक्षम्य राजकारण !

पंतप्रधानांना फिरोजपूर येथील त्यांचे कार्यक्रम रहित करून तब्बल २ घंट्यांचा परतीचा रस्ता पकडावा लागला. आता यावर राजकारण तापले आहे. कशावर राजकारण करायचे ? याचे भारतीय राजकारण्यांना सुवेरसुतक नाही ! त्यात काँग्रेसची तर काय कथा ! ‘देशाच्या विभाजनासाठी कार्यरत असलेला अधिकृत राजकीय पक्ष’, असे काँग्रेसविषयी म्हटल्यास अतिशयोक्ती वाटणार नाही ! काँग्रेसचे नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांनी या प्रकरणात स्वत:चे उत्तरदायित्व झटकले असून ‘पंतप्रधानांचे कार्यक्रमस्थळी हवाईमार्गे न जाता रस्त्याने जाण्याचे नियोजन अचानक झाल्याने सुरक्षाव्यवस्थेमध्ये त्रुटी राहिली’, असे हास्यास्पद आणि अत्यंत असंवेदनशील स्पष्टीकरण दिले आहे. भाजप, तसेच अन्य राजकीय पक्षांनी या प्रकरणात काँग्रेसला उत्तरदायी ठरवले आहे; परंतु काँग्रेस यापासून दूर पळत आहे. मुळात पंतप्रधानांसारख्या अतीमहनीय व्यक्तीशी संबंधित सुरक्षाव्यवस्था ही अत्यंत चोख असावी लागते. पंतप्रधानांच्या चारचाकी गाडीच्या अत्याधुनिक सुरक्षायंत्रणेविषयीची चर्चा वरचेवर केली जाते; परंतु जर सुरक्षेसंबंधी कार्यपद्धतींमध्ये कुठे न्यूनता राहिली, सुरक्षायंत्रणेतील कडीमध्ये कुठे दायित्वशून्यता राहिली, तर या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग तरी काय ? मुळात पंजाब पोलिसांना पंतप्रधानांच्या दौर्‍यात झालेल्या पालटाविषयी वेळेतच सांगण्यात आले होते. ‘पंतप्रधान कोणत्या वाटेवरून जाणार आहेत, हे आंदोलक शेतकर्‍यांना कसे काय कळले ?’, याचे अन्वेषण व्हायला हवे. पंतप्रधानांच्या दौर्‍याविषयीची माहिती केवळ पंजाब सरकारमधील संबंधित मंत्री, प्रशासकीय अधिकारी आणि पंजाब पोलिसातील वरिष्ठ अधिकारी यांच्यापर्यंतच सीमित होती. मग ही माहिती बाहेर कशी गेली ? याचा विचार होऊन संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी ! एकूणच राजकारणापेक्षा देशाची आणि त्याच्या सर्वाेच्च नेत्याची सुरक्षा सर्वांत महत्त्वपूर्ण असून या सुरक्षायंत्रणेतील गलथानपणाला पंजाब सरकार अन् तेथील पोलीस उत्तरदायी आहेत, हे नाकारता येत नाही  !