आंदोलक रस्ता रोखतील, अशी व्यवस्था पोलिसांनी जाणीवपूर्वक केली ! – देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

पंजाब येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाडीचा ताफा रोखल्याचे प्रकरण

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गावर आंदोलन करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. त्या आंदोलनाला जाणीवपूर्वक अनुमती देण्यात आली. आंदोलकांना न थांबवता, ते रस्ता रोखतील, अशी व्यवस्था पोलिसांनी जाणीवपूर्वक करू दिली, असा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ६ जानेवारी या दिवशी पत्रकार परिषदेत केला.

५ जानेवारी या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब येथे सार्वजनिक सभेला जात असतांना आंदोलकांनी त्यांच्या गाडीचा ताफा अडवला. त्यामुळे पंतप्रधानांना १५-२० मिनिटे रस्त्यावर थांबावे लागले. त्यानंतर पंतप्रधानांना माघारी फिरावे लागले. या गंभीर प्रकाराविषयी देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत वरील आरोप केला.

या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘ही देशातील आजपर्यंतची गंभीर घटना आहे. देशात अनेक वेळा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी सरकारे पाहिली आहेत. पंतप्रधान वेगळ्या पक्षाचे असले, तरी मुख्यमंत्री अन्य पक्षांचे असतात. असे असले, तरी देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षिततेविषयी अशा प्रकारचा खेळ पाहिला नाही.

पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यांनी या घटनास्थळापासून पाकिस्तानची सीमा जवळ असल्याचे सांगितले आहे. यातून पंतप्रधानांचा जीव धोक्यात घालण्याचे काम पंजाब सरकारने जाणीवपूर्वक केले. अशा कठीण परिस्थितीत पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी दूरभाषवर येण्याचेही सौजन्य दाखवले नाही. यातून या प्रकरणात काही कट शिजल्याचे दिसून येते. पंतप्रधानांवरील आक्रमण हे व्यक्तीवर नसून देशावरील आक्रमण आहे. देशासाठी शरमेची गोष्ट आहे.