‘एलियन्स’कडून पृथ्वीच्या विरोधात लघुग्रहांचा वापर ‘विनाशकारी अस्त्र’ म्हणून केला जाऊ शकतो !

अमेरिकेतील तज्ञाचा दावा 

प्रतिकात्मक छायाचित्र

वॉशिंग्टन (अमेरिका) – ‘एलियन्स’ म्हणजेच परग्रहवासियांकडून अंतराळातील लघुग्रहांचा वापर ‘विनाशकारी अस्त्र’ म्हणून केला जाऊ शकतो. या लघुग्रहांच्या साहाय्याने पृथ्वीवर उपस्थित सर्व साधने नष्ट केली जाऊ शकतात. ते आक्रमणापूर्वी पृथ्वीवर हेरगिरी करू शकतात, असा दावा युद्धाच्या पालटत्या पद्धतींचे तज्ञ म्हणून ओळखले जाणारे अमेरिकेतील ‘यूएस् एअर कमांड अँड स्टाफ कॉलेज’चे प्राध्यापक पॉल स्प्रिंगर यांनी एका मुलाखतीमध्ये केला आहे. अंतराळात उपस्थित असलेले महाकाय लघुग्रह पृथ्वीसाठी संभाव्य धोका आहेत. अनेक लघुग्रहांनी पृथ्वीवर आघात केल्याचा इतिहास आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

१. प्रा. स्प्रिंगर यांच्या म्हणण्यानुसार अवकाशात असे काहीतरी आहे, जे अमेरिकेला ज्ञात नाही किंवा समजू शकत नाही. पृथ्वीवर जर एखादे आक्रमण झालेच, तर हे असेच आक्रमण असेल, जसे ३०० वर्षांपूर्वी युरोपीय लोकांनी अमेरिकेवर केले होते. त्यावेळी अनेक साधने नष्ट झाली होती आणि स्थानिकांचा नाश झाला होता.

२. प्रा. स्प्रिंगर यांनी दावे करतांना म्हटले की, ‘एलियन’ ही भटकी जमात असू शकते. त्यांच्या आवश्यक गोष्टी लपवण्यासाठी ते इतर ग्रहांवर हेरगिरी करू शकतात. पृथ्वीवरील अण्वस्त्रे ही ‘लेझर’ (‘क्ष’ किरण) आणि लघुग्रह यांच्यासारखी विशेष शस्त्रे वापरून नष्ट केली जाऊ शकतात. एलियन्सची काही शस्त्रे अत्यंत धोकादायक विषाणूही असू शकतात. त्यामुळे मानवी लोकसंख्याच नष्ट होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

३. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने दिलेल्या माहितीनुसार वर्ष २०२२ च्या पहिल्या मासामध्ये ५ महाकाय लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून प्रवास करणार आहेत. यामध्ये एखाद्या बसएवढ्या आकाराच्या लघुग्रहाचाही समावेश आहे, जो या आठवड्यातच  पृथ्वीच्या जवळ पोचण्याची शक्यता आहे.