सनातनचे संतरत्न पू. लक्ष्मण गोरे यांची त्यांच्या वयाच्या १५ व्या वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी झालेली हृद्य भेट !

सनातनचे ११४ वे व्यष्टी संतरत्न पू. लक्ष्मण मनोहर गोरे (वय ८० वर्षे) यांची त्यांच्या वयाच्या १५ व्या वर्षी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याशी झालेली हृद्य भेट, तसेच त्यांचा साधनेचा आरंभ !

स्वातंत्र्यवीर सावरकर

१. लहानपणापासूनच वडिलांकडून राष्ट्रप्रेमाची शिकवण मिळणे

‘मी १५ वर्षांचा असतांना म्हणजे अनुमाने ६५ वर्षांपूर्वी (वर्ष १९५६ – १९५७ मध्ये) मला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भेटण्याची अनमोल संधी मिळाली. माझे बालपण आणि शालेय शिक्षण लोणावळा, महाराष्ट्र येथे झाले. माझे वडील कै. श्री. मनोहर गोरे यांचे सौंदर्यप्रसाधने विकण्याचे दुकान होते. ते ‘हिंदु महासभे’च्या माध्यमातून कार्य करत असत. तेथे त्यांना पद वगैरे काही नव्हते. ते राष्ट्रप्रेमी होते. त्यांचे राष्ट्रप्रेम आम्हा भावंडांमध्ये बालपणीच रूजले. ही केवळ भगवंताची कृपा आहे.

पू. लक्ष्मण गोरेआजोबा

२. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याशी झालेली हृदयस्पर्शी भेट

२ अ. स्वातंत्र्यवीर सावरकर प्रवासात असतांना कार्यकर्त्यांना ३ – ४ मिनिटे तरी आवर्जून भेटत असणे : त्या वेळी भारत देश नुकताच इंग्रजांच्या राजवटीतून मुक्त होऊन गांधी वधाच्या घटनेतून सावरत होता. त्या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर ठिकठिकाणी सभा घेत असल्याचे मी ऐकत होतो. त्या वेळी मी लहान होतो. आता वयोमानाने मला नेमकी तेव्हाची परिस्थिती स्मरणात नाही. त्या काळी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर प्रवासात असतांना ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांना अगदी ३ – ४ मिनिटे का होईना आवर्जून भेटत असत’, हे विशेष होते. कार्यकर्त्यांना त्यासंबंधी निरोप मिळाल्यावर ते निश्चित ठिकाणी आणि वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भेटण्यासाठी येत असत.

२ आ. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भेटायला लोणावळा रेल्वेस्थानकावर जाणे : एकदा माझ्या वडिलांना स्वातंत्र्यवीर सावरकर लोणावळा रेल्वेस्थानकात येत असल्याचा निरोप मिळाला. त्या वेळी दुकानात कुणी नसल्याने आणि माझी शाळा रेल्वेस्थानकाजवळच असल्याने वडिलांनी मलाच त्यांना भेटायला जायला सांगितले. त्यांनी मला ‘ही संधी सोडू नकोस’, असेही सांगितले. वडिलांचे आज्ञापालन म्हणून आणि ‘स्वातंत्र्यवीर सावरकर भेटणार’, याचा आनंद झाल्याने मी वर्ग चालू असतांनाच गुरुजींना खरे कारण सांगून रेल्वेस्थानकावर गेलो.

२ इ. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांना प्रत्यक्ष पहायला आणि भेटायला मिळणार’, याचा आनंद होणे : मला रेल्वेस्थानकावर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आगमनाची प्रतीक्षा करत असलेले ७ – ८ राष्ट्रप्रेमी दिसले. त्यांना पाहून ‘ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आणि प्रत्यक्ष कार्य करणारे असतांना माझ्याकडे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लक्ष तरी जाईल का ?’, असा मला प्रश्न पडला; मात्र मला ‘सावरकर यांना प्रत्यक्ष पहायला आणि भेटायला मिळणार’, याचा आनंद झाल्यामुळे त्या प्रश्नाचा माझ्यावर कोणताही परिणाम झाला नाही.

२ ई. देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणार्‍या ‘महानायका’च्या चरणी आपोआपच हात जोडले जाणे : स्वातंत्र्यवीर सावरकर ज्या रेल्वेने प्रवास करत होते, ती रेल्वेस्थानकात आल्यावर आम्ही त्यांना भेटलो. त्या ३ – ४ मिनिटांच्या भेटीत मी वयाने लहान आणि शालेय पोशाखात असल्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे माझ्याकडे त्वरित लक्ष गेले. तेव्हा ते ७३ – ७४ वर्षांचे असावेत. त्यांच्याकडे पाहून त्यांच्या ‘जाहीर सभा, त्यांची भाषणे’, यांविषयी माझे वडील आणि वडीलबंधू जी चर्चा करत असत, त्याचे मला काही क्षणांत स्मरण झाले अन् एका महान राष्ट्रकार्य करणार्‍या, देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणार्‍या आणि अनन्वित यातना सोसणार्‍या ‘महानायका’च्या चरणी माझे हात जोडले गेले.

२ उ. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी शाळेचे नाव मराठीत सांगायला सांगणे आणि ‘यापुढे इंग्रजीचा वापर करणे टाळूया’, हे त्यांचे वाक्य हृदयात कोरले जाणे : मला ते नेमके क्षण आता पूर्ण स्मरणात नाहीत; पण स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांनी दिलेली एक शिकवण मला आठवते. त्या वेळी त्यांनी माझी प्रेमाने विचारपूस केली. मी त्यांना सांगितले, ‘‘मी श्री. मनोहर गोरे यांचा मुलगा आहे आणि ते येऊ शकत नसल्याने मी आलो आहे.’’ तेव्हा ते आनंदाने म्हणाले, ‘‘ते येऊ शकले नाहीत; म्हणून तुझी भेट झाली.’’ मी त्यांना माझा परिचय करून देतांना मी शिकत असलेल्या शाळेचे नाव ‘विद्या प्रसारणी सभेचे हायस्कूल’ असे सांगितले. तेव्हा ‘हायस्कूल’ हा शब्द ऐकताच त्यांनी रेल्वेच्या डब्याच्या (‘बोगी’च्या) खिडकीतूनच हात बाहेर काढून माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मला अतिशय प्रेमाने; पण ठामपणे सांगितले, ‘‘बाळा, शाळा, प्रशाला, विद्यालय, महाविद्यालय आणि विश्वविद्यालय, अशी कडी असते. यापुढे इंग्रजीचा वापर करणे टाळूया.’’ स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ते वाक्य माझ्या हृदयात कोरले गेले. तेव्हापासून मी इंग्रजीचा वापर करणे टाळतो आणि माझ्या संपर्कात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला शुद्ध मराठीत बोलण्याचा प्रयत्न करायला सांगतो.

२ ऊ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले भाषाशुद्धीचे महत्त्व लक्षात येणे : पुढे काही वर्षांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीही भाषाशुद्धीविषयी सांगितले आणि त्याविषयी ग्रंथ-लिखाण केले. त्यामुळे मला भाषाशुद्धीचे महत्त्व पटले. ‘भाषाशुद्धीसाठी स्वतःकडूनच प्रयत्न व्हावेत’, हा विचार दृढ झाला.

२ ए. वर्ष १९५६ – ५७ मध्ये झालेल्या त्या ३ – ४ मिनिटांच्या भेटीतूनच माझ्यातील देशभक्ती वृद्धींगत झाली. देवाने माझ्याकडून देशसेवाही करवून घेतली.

३. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करणे

३ अ. सत्संग, समष्टी आणि व्यष्टी साधना यांचे महत्त्व समजणे : वर्ष १९९७ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मुंबई येथील विविध ठिकाणी झालेल्या जाहीर सभांच्या माध्यमातून आणि गोरेगाव, मुंबई येथील श्री. अनिल जठार यांच्या माध्यमातून मला ‘सत्संग, समष्टी साधना आणि व्यष्टी साधना’ यांचे महत्त्व समजले.

३ आ. समष्टी साधना आणि व्यष्टी साधना घडल्याबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता : ‘अध्यात्मातील काही सेकंदांच्या सत्संगाचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम काय असतो ?’, याची अनुभूती परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला दिली. ‘आपल्या जीवनात घडणारे प्रसंग हे ईश्वरेच्छेनेच घडत असतात’, हेच मला शिकायला मिळाले. भगवंतानेच माझी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी भेट घडवून आणली. त्यामुळेच पुढील जीवनात या जिवाकडून देशसेवा (समष्टी साधना) करवून घेतली आणि परात्पर गुरुदेवांनी माझ्याकडून व्यष्टी साधना करवून घेऊन माझ्या जीवनाचे सार्थक केले. त्याबद्दल परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– (पू.) लक्ष्मण मनोहर गोरे, फोंडा, गोवा. (१६.१२.२०२१)