सांगली, ४ जानेवारी (वार्ता.) – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय कला मंच आयोजित विभास्तरीय ‘प्रतिभा संगम’ हे विद्यार्थी साहित्य संमेलन पटवर्धन हायस्कूलमध्ये ५ जानेवारी या दिवशी होत आहे. राष्ट्रीय कला मंचच्या माध्यमातून वर्ष १९९६ मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७०० व्या संजीवन समाधी वर्षानिमित्त चालू झालेल्या या साहित्य संमेलनाला २५ वर्ष पूर्ण झाली.
‘प्रतिभा संगम’ या राज्यस्तरीय साहित्य संमेलनामध्ये अधिकाधिक विद्यार्थी साहित्यिकांना सहभाग घेता यावा आणि संमेलनाची गुणवत्ता वाढावी; म्हणून यावर्षी विभाग आणि राज्य स्तरीय अशा दोन स्तरांवर हे संमेलन होणार आहे. या साहित्य संमेलनामध्ये, मराठी आणि हिंदी कविता, वैचारिक लेख, ललित लेख, कथा, पथनाट्य, अनुदिनी (ब्लॉग) या साहित्यप्रकारांच्या समांतर सत्रांच्या माध्यमांतून स्पर्धा होणार आहेत. तरी अधिकाधिक साहित्यप्रेमींनी या संमेलनाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.