आजपासून इयत्ता दहावी ते बारावीपर्यंतचे वर्ग २६ जानेवारीपर्यंत ‘ऑनलाईन’ ! – डॉ. शेखर साळकर, जलद कृती समिती

परीक्षा ‘ऑफलाईन’ घेणार !

गोवा : जलद कृती समितीचे सदस्य डॉ. शेखर साळकर

पणजी – ४ जानेवारीपासून २६ जानेवारीपर्यंत शाळांमधील प्रत्यक्ष शिकवणीवर्ग रहित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दहावी, अकरावी आणि बारावी या इयत्तांच्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लस देण्यात येत असल्याने त्यांना आपापल्या शाळेत उपस्थित रहावे लागणार आहे; मात्र लस घेतल्यानंतर ते घरी थांबू शकतात आणि घरूनच ‘ऑनलाईन’ वर्गांना उपस्थित राहू शकतात, असे जलद कृती समितीचे सदस्य डॉ. शेखर साळकर यांनी सांगितले. कोरोना महामारीविषयी सरकारला योग्य निर्णय घेण्याच्या दृष्टीने सल्ला देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जलद कृती समितीच्या (टास्क फोर्स) बैठकीनंतर डॉ. साळकर पत्रकारांशी बोलत होते. परीक्षा मात्र ‘ऑफलाईन’ घेण्यात येणार आहे. याविषयीची मार्गदर्शक तत्त्वे सरकार आज किंवा उद्या प्रसिद्ध करणार आहे, असे ते पुढे म्हणाले.

‘जलद कृती दला’कडून रात्रीच्या संचारबंदीची शिफारस

गोव्यात २६ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत ‘नाईट कर्फ्यू’ (रात्रीची संचारबंदी) लागू करण्याची शिफारस जलद कृती दलाने (टास्क फोर्स) सरकारला केली आहे.

(सौजन्य : ANI News)

बंद सभागृहांमधील कार्यक्रमांवर कठोर निर्बंध लादण्यात येणार आहेत, तर खुल्या जागेतील कार्यक्रमांवर अल्प निर्बंध असेल, असे डॉ. साळकर यांनी सांगितले. सध्या प्रतिसप्ताह कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण ५.६ टक्के एवढे आहे आणि ही स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. पुढच्या सप्ताहातील कोरोना संसर्गाची आकडेवारी निर्णायक ठरणार आहे, असे डॉ. साळकर यांनी सांगितले.

रात्रीच्या संचारबंदीविषयी अद्याप निर्णय नाही ! – मुख्यमंत्री

(सौजन्य : ANI News)

पणजी – गोव्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत प्रतिदिन होत असलेली वाढ लक्षात घेऊन सरकारने शाळांमध्ये निर्बंध लागू करण्याचे निश्‍चित केले आहे; मात्र रात्रीच्या संचारबंदी (नाईट कर्फ्यू) विषयी अद्याप निर्णय घेतलेला नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे सांगितले. जलद कृती दलाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कोरोनाविषयक निर्बंधांविषयीचे सविस्तर परिपत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दिवसभरात ६३१ कोरोनाबाधित

गोव्यात दिवसभरात ६३१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत आणि ही संख्या एका दिवसातच दुप्पट झाली आहे. कोरोनाविषयक चाचणीच्या तुलनेत कोरोनाबाधित आढळण्याचे हे प्रमाण २६.४३ टक्के आहे. दिवसभरात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या २ सहस्र २४० झाली आहे.