महाराष्ट्रात प्रतिदिन एका विभागाच्या परीक्षांचा पेपर फुटल्याचे वृत्त ऐकायला मिळत आहे. साधू-संतांच्या महाराष्ट्रात उच्चविद्याविभूषित (?) सरकारी अधिकार्यांनी पैशांसाठी अनैतिकतेचा कहर केल्याचे चित्र समोर आले आहे. सरकारी अधिकार्यांनी लाच घेऊन विद्यार्थ्यांना ‘शिक्षक’ म्हणून ‘पात्र’ ठरवणे, हा एक प्रकारचा समाजद्रोहच म्हणावा लागेल. ‘म्हाडा’च्या नोकरभरतीच्या पेपरफुटीचे प्रकरण संपत नाही, तोच ‘शिक्षक पात्रता परीक्षे’च्या पेपरफुटीचे प्रकरण समोर आले. यामध्ये महाराष्ट्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपे हेच दोषी आढळून आले. पोलिसांनी सुपे यांच्यासह शिक्षण आयुक्तांचे सल्लागार अभिषेक सावरीकर यांनाही अटक केली. त्यातून अनेकांना पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
यामुळे प्रामाणिकपणे कष्ट घेऊन परीक्षा देणार्यांमध्ये अन्याय झाल्याची नैसर्गिक भावना निर्माण झाली असणार हे नक्की ! त्यावर सरकार काय उपाययोजना करणार ? ‘म्हाडा’ आणि ‘शिक्षण विभाग’ यांच्याशी संबंधित मंत्र्यांनी याविषयी दोषी असणार्यांना शिक्षा करण्याचे आश्वासन दिले असले, तरी सामान्य नागरिकांना आढळून येणारी ही गोष्ट सर्व यंत्रणा हाताशी असणार्या शासनकर्त्यांना का दिसत नाही ? यामुळे भविष्यात नागरिकांनी संबंधित मंत्र्यांचीही चौकशी करण्याची मागणी केल्यास आश्चर्य वाटायला नको !
आज लोकशाहीमध्ये समाज पोखरणार्या भ्रष्ट प्रशासकीय अधिकार्यांनी कुंपण घातले आहे, जे सामान्य जनतारूपी शेत खाऊ लागले आहे. आतापर्यंत शिक्षण संस्था, साखर कारखाने आदी क्षेत्रांतील भ्रष्टाचाराविषयी सामान्य नागरिकांच्या मनात चीड होती; मात्र शिक्षणक्षेत्रातील भ्रष्ट शासकीय अधिकारी पाहिल्यावर युवा पिढीचे भवितव्य किती अंधकारमय आहे ? हे लक्षात येते. हे चित्र पालटण्यासाठी शालेय शिक्षणामध्ये नीतीमूल्यांसमवेत धर्मशिक्षणाचा समावेश झाला, तरच नि:स्वार्थी आणि त्यागी विद्यार्थी पुढे ‘शिक्षक’ म्हणून राष्ट्राची धुरा समर्थपणे पेलतील. ‘परीक्षा घेणारा परीक्षार्थीहून श्रेष्ठ असावा’, असा प्रघात आहे; मात्र पेपरफुटीच्या प्रकरणात शिक्षण मंडळाचे अध्यक्षच दोषी असतील, तर ते शिक्षकांची ‘पात्रता परीक्षा’ घेण्यास ते ‘अपात्र’च म्हणावे लागतील. हे चित्र लवकर पालटले नाही, तर विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणे अभ्यास करून उत्तीर्ण होण्यावरचा विश्वास उडेल आणि हे देशासाठी घातक असेल.
– श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा