शेवगाव (जिल्हा नगर) – मुंबई येथील नामांकित उद्योजक तथा नगर जिल्ह्यातील शेवगावच्या ‘दत्त देवस्थान’चे श्रद्धावान साधक गिरीश साठे यांना शेवगाव तालुका आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा वर्ष २०२१-२०२२ चा ‘सामाजिक कार्य गौरव’ पुरस्कार घोषित झाला आहे. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, मानाचा फेटा आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पत्रमहर्षि कै. बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनी श्री तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली ६ जानेवारी या दिवशी शेवगाव येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे, अशी माहिती शेवगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. कैलास बुधवंत यांनी दिली.
श्री. बुधवंत यांनी सांगितले की, अष्टांगयोग योगतज्ञ परमपूज्य दादाजी वैशंपायन यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शेवगावच्या दत्त पंढरीत श्री. साठे यांनी १० लाख रुपये व्यय करून सौरऊर्जेवरील स्ट्रीट लाईटची उभारणी केली, तसेच वर्ष २०२०-२०२१ मध्ये कोरोना दळणवळण बंदीच्या काळात त्यांनी शेवगाव शहर आणि परिसरातील ३२० गरीब अन् गरजू कुटुंबांना अडीच लाख रुपये मूल्याचे किराणा मालाचे वाटप करून सामाजिक दायित्व पार पाडले आहे. त्यांच्या या कार्याची नोंद घेत त्यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे.