१. एकाच विषयावर मन केंद्रित करणे म्हणजे एकाग्रता !
‘एकाग्रता म्हणजे ‘एकमात्र विषयात’ ! (‘एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे’) मानसशास्त्रज्ञांच्या मते प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एका दिवसात एकानंतर एक असे अनुमाने ६० सहस्र विचार येऊन जातात. त्या विचारांपैकी काही विचार सकारात्मक, तर काही विचार नकारात्मक असतात. मनातील इतर सर्व अनावश्यक विचारांना बाजूला सारून एकाच विषयावर मन केंद्रित करण्याच्या क्रियेला ‘एकाग्रता’ असे म्हणतात. एकाग्रता म्हणजे मन, बुद्धी आणि पंचज्ञानेंद्रिये हे सर्व एकाच वेळी एकाच कामात गुंतून रहाणे !
२. एकाग्रतेमुळे होणारा लाभ आणि यशाचे बीज म्हणजे एकाग्रता !
मनाच्या एकाग्रतेमुळे अनेक लाभ होतात. त्यातील काही प्रमुख लाभ म्हणजे मानसिक विकारांपासून मुक्ती ! ‘मनामध्ये जेवढे विचार अल्प, तेवढे विकार अल्प !’ मानसशास्त्रज्ञांच्या मते ज्या व्यक्ती अतीविचार करत असतात, ज्यांच्या मनामध्ये सतत विचारांची गर्दी असते, अशाच व्यक्ती अधिक करून मानसिक आणि मनोशारीरिक विकारांना बळी पडतात. शांत स्वभावाचे आणि स्वतःच्या मनावर नियंत्रण असणार्या व्यक्ती शक्यतो विकारांपासून मुक्त असतात. ‘एकाग्रता यशोबीजम् ।’ म्हणजे ‘एकाग्रता हे यशाचे बीज आहे.’ याचाच अर्थ जीवनातील कोणत्याही क्षेत्रामध्ये उत्तुंग यश प्राप्त करण्यासाठी एकाग्रता ही एक गुरुकिल्ली आहे.
३. अभ्यास करतांना विद्यार्थ्याची एकाग्रता, आवड आणि समरसता यांना महत्त्व !
शिक्षणपद्धत ही एकाग्रता, स्मरणशक्ती, आकलनशक्ती आणि निरीक्षणशक्ती इत्यादी मानसिक क्षमतेवर अवलंबून आहे. ही क्षमता शैक्षणिक जीवनाचा मूलभूत पाया आहे; परंतु दुर्दैवाने भारतातील शाळा आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रम यांतून वरील क्षमतांच्या विकासासंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात नाही; म्हणून विद्यार्थी तणावग्रस्त होतात. परीक्षेच्या कालावधीत तर आत्महत्येसारखे भयंकर विचार त्यांच्या मनामध्ये सतत येत रहातात.
विद्यार्थी किती घंटे अभ्यास करतो ? कसा आणि कुणासह करतो ? कुठे बसून करतो ? त्याने किती महागडे शिकवणीवर्ग (ट्युशन्स) लावले आहेत ? यापेक्षा तो अभ्यास किती एकाग्रतेने, आवडीने आणि समरस होऊन करतो, याला महत्त्व आहे.’
– डॉ. सुभाष चौधरी (साभार : दिवाळी अंक ‘आनंदी ज्योतिष’)