सर्दी, खोकला आणि ताप यांसारखी लक्षणे असणार्‍यांना अहवाल येईपर्यंत कोरोना संशयित मानले जाणार ! – आरोग्य मंत्रालय

मुंबई – सर्दी, खोकला, डोकेदुखी, घसा खवखवणे, श्वास लागणे, अंगदुखी, चव अल्प येणे, थकवा आणि अतीसार यांसह ताप यांसारखी काही लक्षणे आढळून आल्यास व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत संबंधित व्यक्तीला संशयित कोरोनाबाधित मानले जावे, असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना दिले आहेत, तसेच अशी लक्षणे आढळून आलेल्या सर्व व्यक्तींच्या कोरोनाची चाचणी करणे आवश्यक आहे, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. हा वेग पाहून केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि ‘आय.सी.एम्.आर्.’ने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवून चाचण्यांचा वेग वाढवण्यास सांगितले आहे. यासमवेतच बाधित झालेल्यांची संख्या वाढल्यामुळे आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी अहवाल येण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने राज्यांना ‘अँटीजेन’ चाचण्यांची संख्या वाढवून लोकांना स्व-परीक्षण किट वापरण्यास प्रोत्साहित करावे, असे म्हटले आहे. केंद्र सरकारने अनेक स्व-परीक्षण किट संमत केले आहेत.