गया (बिहार) येथे पिंडदान करण्यासाठी पालिका घेणार ५ रुपये शुल्क

  • हिंदूंच्या धार्मिक कृतींवर अशा प्रकारचे शुल्क घेणे म्हणजे नवा औरंगजेबी ‘जिझिया कर’च होय ! याचा हिंदु संघटनांनी प्रखर विरोध करून तो रहित करण्यास भाग पाडले पाहिजे ! – संपादक
  • सरकारकडून एकीकडे मुसलमानांचे लांगूलचालन म्हणून मदरशांमध्ये आधुनिक शिक्षण देण्यासाठी अनुदान आणि अन्य सोयी-सुविधांसाठी पैशांची उधळपट्टी केली जाते, तर दुसरीकडे हिंदूंच्या यात्रांवर अतिरिक्त प्रवास शुल्क आकारण्यासारखे प्रकार होतांना दिसतात. ही आहे भारतीतील ‘धर्मनिरपेक्षते’ची व्याख्या ! निधर्मी सरकारी यंत्रणेच्या या अन्यायावर ‘हिंदु राष्ट्र’ हाच एकमेव उपाय आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक

गया (बिहार) – गया नगरपालिकेकडून शहरात ज्या ठिकाणी पिंडदान केले जाते, त्या ५० ‘पिंड वेदी’ येथे पिंडदान करण्यास येणार्‍या प्रत्येकाकडून ५ रुपये शुल्क घेतले जाणार आहे. पालिकेकडून या पिंड वेदी परिसराची स्वच्छता आणि देखभाल यांसाठी एका आस्थापनाला वार्षिक साडेपाच लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने हे शुल्क वसूल करण्यात येणार आहे; मात्र या निर्णयाला येथील पुरोहित आणि त्यांची संघटना यांनी विरोध केला आहे. ‘याचे परिणाम भोगावे लागतील’, अशी चेतावणी त्यांनी दिली आहे.

१. येथील पंडा समाज आणि विष्णुपद प्रबंधकारिणी समितीने विरोध करतांना म्हटले आहे की, अशा प्रकारे पालिका शुल्क वसूल करत असतील, तर तीर्थ यात्रेकरूंच्या दृष्टीने हे पवित्र स्थान वसुलीचा अड्डा बनेल. अशा प्रकारचे शुल्क गोळा करणे, हा पैसे कमावण्याचा स्रोत बनू नये. हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा.

२. विष्णुपद प्रबंधकारिणी समितीचे अध्यक्ष शंभूलाल विठ्ठल यांनी म्हटले की, अशा प्रकारच्या निर्णयामुळे लोकांमध्ये निराशेचे वातावरण आहे. या निर्णयावर पालिका आणि प्रशासन यांनी पुनर्विचार केला पाहिजे.

३. गया नगरपालिकेने याविषयी म्हटले आहे की, पिंड वेदीतील सीताकुंड आणि अक्षयवट मंदिर या परिसरातील स्वच्छता अन् देखरेख यांसाठी कंत्राट देण्यात आले आहे. त्यानंतर येथे शुल्क वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे.