‘ऑनलाईन’ शाळा : एक मोठी समस्या !

प्रतिकात्मक छायाचित्र

कोरोना महामारीमुळे सर्व प्रकारचे शिक्षण ‘ऑनलाईन’ पद्धतीने देण्यात येऊ लागले. आरंभी ‘ऑनलाईन शिक्षण’ ही संकल्पना भारतात नवीन असल्याने त्याविषयी सर्वांना पुष्कळ उत्सुकता आणि उत्साह होता; कारण शाळेत जाण्याची, लवकर उठण्याची घाई नव्हती, महिलांनाही जेवणाचा डबा बनवण्याची गडबड नव्हती; पण हळूहळू ‘ऑनलाईन’ शिक्षणपद्धतीचे दुष्परिणाम समोर येत आहेत. प्राथमिक शिक्षणापासून ते पदवी किंवा पुढील शिक्षणापर्यंत सर्वांनाच याचा फटका बसला आहे.

संस्कार आणि सर्वांगीण विकास यांना मुकलेले विद्यार्थी !

प्राथमिक शिक्षण घेणार्‍या मुलांचे वयच मुळातच कमी असते ! बुद्धीची क्षमता अत्यल्प असतांना ज्या वयात त्यांना योग्य शिक्षण आणि शिस्त यांची आवश्यकता असते, त्याच वयात त्यांच्याकडून हे सर्व हिरावले गेले. ‘ऑनलाईन’ वर्गात बसणार्‍या बर्‍याच लहान मुलांना शिकवलेले समजत नाही. समजले नाही, तर शिक्षकांना पुन्हा विचारण्याची सोय नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्वांगीण विकासासाठी समवेत मित्र नाहीत कि खेळायची सोय राहिली नाही. अनेक घंटे केवळ भ्रमणभाषच्या छोट्याशा पडद्यासमोर (‘स्क्रीन’समोर) बसून रहावे लागत आहे. सतत बसून रहाण्यामुळे मुलांचा शारीरिक विकासही मंदावला आहे, तसेच सतत भ्रमणभाषच्या छोट्याशा पडद्याकडे बघून मुलांच्या कोवळ्या डोळ्यांवर ताण येऊ लागला. शिकण्याचा कंटाळा आला की, ‘व्हिडीओ बंद करायचा आणि थोडा वेळ खेळायचे’, अशा कृती चालू होतात. त्यामुळे योग्य वयात लागणारी शिस्त आणि शिक्षकांची आदरयुक्त भीती आता न्यून झाली. तसेच ज्या पालकांना तंत्रज्ञानाचे ज्ञान नाही, त्या घरात तर आणखीनच बिकट परिस्थिती आढळते.

मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक र्‍हासाचे उत्तरदायित्व कुणाचे ?

मित्र-मैत्रिणी सोबत नसल्याने सतत घरात राहून मुलांमधील एकलकोंडेपणा वाढला आहे आणि त्यामुळे चिडचिडेपणा, राग, हट्टीपणा यांचेही प्रमाण प्रचंड वाढले आहे. घरी आवडीप्रमाणे आणि सवलतीने खाणे-पिणे वाढले असल्यामुळे पोषक आहार बंद पडून बर्‍याच लहान मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत चालला असल्याचे निरीक्षणे आणि अभ्यास यांवरून लक्षात आले. या महत्त्वाच्या वयात मुलांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास कसा होणार ? तसेच झालेल्या र्‍हासाचे उत्तरदायित्व कोण घेणार ? हे प्रश्न पालकांसमोर आहेत.

मानसिक आजार आणि नैराश्य यांच्या गर्तेत युवा पिढी !

प्रतिकात्मक छायाचित्र

ऑनलाईन पद्धतीने माध्यमिक किंवा महाविद्यालयीन शिक्षण घेण्यामध्येही वरीलप्रमाणे तोटे आहेत. सोबतच परीक्षा सुद्धा ऑनलाईन स्वरूपात असल्याने सवलत घेण्याचे आणि पुस्तकात बघून उत्तरे लिहिण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे खरी बुद्धीमत्ता दिसून येत नाही आणि अनेकांना अपेक्षेपेक्षा अधिक गुण मिळत असल्याचे लक्षात आले. किशोरवयात नको तेवढा वेळ भ्रमणभाष हातात आल्याने मुलांकडून अनावश्यक व्हिडिओ बघण्यात वेळ घालवला जातो. त्यामुळे युवा पिढीची नैतिकता आणि सवयी यांचा मोठा प्रश्न पालकांसमोर उभा राहिला आहे. कित्येक पालकांना कामाच्या किंवा वेळेच्या अभावामुळे पाल्यांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. त्यामुळे युवा पिढीचे अभ्यासाच्या नावाखाली रात्री उशिरापर्यंत जागरण करण्याचे आणि दिवसा झोपण्याचे प्रमाण वाढत आहे. मानसिक आजारांचे आणि नैराश्याचे प्रमाण युवा पिढीत वाढत चालले आहे.

ज्या वयात शरिराला योग्य आहार आणि व्यायाम यांची, तसेच मनाला संस्कारांची आवश्यकता असते, त्या वयात राष्ट्राची भावी पिढी मात्र चैन, मनोरंजन आणि कुसंस्कार यांच्या जगात वावरत आहेत. काही जण निराधार झाले आहेत; कारण ऑनलाईन शिक्षणामुळे परीक्षा, तिचा निकाल यांना विलंब आणि पुढील सर्व प्रक्रियांना विलंबच होत आहे. केवळ उत्तीर्ण होण्याची प्रक्रिया चालू असल्यामुळे खरे ज्ञानार्जन मात्र या ऑनलाईन शिक्षणातून साध्य होतांना काही दिसत नाही.

पालकांची हानीच !

एकंदरीतच ऑनलाईन शिक्षणाचा पाल्य आणि पालक या दोघांवर मोठा परिणाम झाला आहे. ग्रामीण भागातील अनेक  ठिकाणी ‘इंटरनेट’ची सुविधा नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. अनेकांना आर्थिक हानी सोसून भ्रमणभाष किंवा भ्रमणसंगणक घ्यावे लागले. काही कुटुंबांमध्ये एकाहून अधिक विद्यार्थी असतात. अशा वेळी घरात एकच भ्रमणभाष असल्याने अन्य पाल्यांची हानी होते. कोरोनामुळे आधीच सर्वसामान्य पालकांना आर्थिक हानीला सामोरे जावे लागले, त्यात भ्रमणभाष आणि इंटरनेट यांचा खर्च वाढल्याने पालक तणावाच्या स्थितीत गेले आहेत. एकीकडे विज्ञानाने प्रगती केलेली असली, तरी राष्ट्राला सांभाळणारी पिढी मात्र संकटात असल्याने एक प्रकारे राष्ट्रच संकटात आहे.

मुलांना योग्य संस्कार आणि ज्ञान देणे, हे पालकांचेच दायित्व !

प्रतिकात्मक छायाचित्र

अशा बिकट परिस्थितीचा विचार करता विद्यार्थ्यांजवळ सर्वाधिक वेळ असतात ते त्यांचे पालक ! पालकांनी त्यांचे घरकाम, नोकरी यांचे नियोजन करून पाल्यांना अधिकाधिक वेळ देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. लहान मुलांना शिकवणे, त्यांना योग्य सवयी लावणे, तसेच किशोरवयात मुले अभ्यासाच्या नावाखाली नेमके काय करतात, भ्रमणभाषवर काय बघतात, यांकडे लक्ष ठेवणे यांसाठी पालकांनी वेळ द्यावा. आरंभी भ्रमणभाष न बघण्याची सक्ती न करता वीरयोद्ध्यांच्या कथा, मालिका, धार्मिक मालिका, इतिहासातील संशोधन, तसेच कला जोपासण्याचे शिक्षण देणारे व्हिडिओ बघण्याकडे कल वाढवावा. ज्यामुळे युवा पिढी न भरकटता त्यांचे देशाविषयी प्रेम आणि आदर वाढेल. यासमवेतच श्लोक, स्तोत्रपठण, नामजप करण्याची आणि देवाजवळ दिवा-उदबत्ती लावण्याची सवय लावावी. त्यामुळे मुलांना साधना करण्याची गोडी त्यांच्यात निर्माण होईल.

पालकांनी प्रतिदिन व्यायाम केला, तर तोच आदर्श समोर ठेवून मुलेसुद्धा व्यायाम करतील. त्यामुळे एकूणच कुटुंबाचाच सर्वांगीण विकास होऊन एकेक कुटुंब सुधारील. असे झाले, तर राष्ट्र सुधारण्यासाठी आणि कोरोना सारख्या संकटाला हरवण्यासाठी वेळ लागणार नाही.