३१ डिसेंबरला वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – ३१ डिसेंबरला वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या १ सहस्र ३७५ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मुंबईसह महाराष्ट्रात अचानक कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने अनेक निर्बंध लागू करण्यात आले. या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबरसाठी कार्यक्रमांचे आयोजन न करणे, रात्रीची संचारबंदी, तसेच लोकांनी रस्त्यावर गर्दी करू नये; म्हणून कलम १४४ लागू करण्यात आले. सर्व निर्बंध लागू असतांनाही अनेक लोक घराबाहेर पडले होते.

मद्यपान करून वाहन चालवत वाहतूक नियमांची पायमल्लीही करणार्‍यांवर विशेष कारवाई करण्याची मोहीम मुंबई पोलिसांनी हाती घेतली होती. यामध्ये १८ जणांविरुद्ध मद्य पिऊन वाहन चालवल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. शिरस्राणाविना दुचाकी चालवणार्‍या ४०८ जणांवर, दुचाकीवर ३ जणांनी प्रवास केल्याप्रकरणी १६ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यासह अन्य वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या एकूण १ सहस्र ३७५ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.