कोल्हापूर, ३१ डिसेंबर (वार्ता.) – विशाळगडाच्या संदर्भात कोणत्या जागेवर किती अतिक्रमण झाले आहे याची मोजणी करण्याचे काम चालू आहे. हे काम साधारणत: एक आठवडा चालेल. गडावरील अतिक्रमणांना पुरातत्व खात्याच्या वतीने देण्यात आलेल्या नोटिसींचा कालावधीही संपला आहे. तरी मोजणी पूर्ण करून लवकरच विशाळगड येथील अतिक्रमण हटवण्यास प्रारंभ होईल, अशी माहिती कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली. विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या वतीने ३१ डिसेंबर या दिवशी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी ही माहिती कृती समितीला दिली. या वेळी कृती समितीचे समन्वयक श्री. किरण दुसे, कृती समितीचे सदस्य आणि शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, कृती समितीचे सदस्य आणि शिवसेना करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, कृती समितीचे सदस्य श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. बाबासाहेब भोपळे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांच्या भेटीत सदस्य श्री. बाबासाहेब भोपळे यांनी जिल्हाधिकारी यांच्या समवेत दोन वेळा बैठका झाल्या, तसेच विशाळगड येथील अतिक्रमणांना दिलेल्या नोटिसींचा कालावधी संपून गेला आहे; मात्र त्यावर कार्यवाही होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. यावर जिल्हाधिकारी यांनी संबंधित प्रशासकीय अधिकार्यांकडून माहिती घेऊन ‘जर नोटिसींच्या विरोधात कुणी न्यायालयात गेले नसेल, तर अतिक्रमण काढण्यास विलंब का होत आहे ?’ असे त्या अधिकार्यांना विचारले. यावर त्या अधिकार्यांनी अद्याप काही मोजणी अपूर्ण असल्याचे सांगितले. यावर जिल्हाधिकार्यांनी ही मोजणी लवकर पूर्ण करून अतिक्रमण काढण्याच्या कामास लवकर प्रारंभ करावा, असे आदेश प्रशासकीय यंत्रणेला दिले. विशाळगड येथील अतिक्रमण आणि तेथील वस्तूस्थिती या संदर्भात लवकरच विशाळगड येथे भेट देऊन पहाणी करू, असे आश्वासनही जिल्हाधिकारी यांनी कृती समितीला दिले.