ब्रम्हध्वज !

ख्रिस्ती नववर्षाच्या ऐवजी गुढीपाडव्याला नववर्ष साजरे करण्याविषयीचे काव्य येथे देत आहोत.

चढत्या रात्री द्रव सोनेरी । चषकांमधली नशा बिलंदर ।
मंद सानुली ज्योत सांगते । हे नच अपुले नवसंवत्सर ।।

थाट चालतो माठ जिवांचा । किनार्‍यावरी गर्दी कलंदर ।
पश्चिमेकडे झुकता झुकता । दिशादिशांतील वाढे अंतर ।।

उगा कशाला सदा वाहता । दास्यवृत्तीची मढी खांद्यावर ।
रूढी तोडूनी गढी गाडता । अभिमानाने फुलेल अंबर ।।

ब्रह्मध्वज हा तुमचा अमुचा । चैत्र पाऊली येई निरंतर ।
सरता तम, हे उजाडेल मग । त्या दिनीचा सूर्यच सुंदर ।।

– डॉ. श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी (साभार : संकेतस्थळ)