‘पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका, परात्पर गुरु डॉक्टर यांचे ज्येष्ठ बंधू) यांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह करून त्यांचा ग्रंथ बनवण्याची सेवा चालू होती. त्या अनुषंगाने माझी पू. भाऊकाकांशी प्रत्यक्ष भेट झाली. काही दिवस मी त्यांना ग्रंथांच्या संदर्भातील संगणकीय धारिका दाखवण्याची सेवा केली. त्या वेळी मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. वेळेचे पालन करणे
पहिल्या दिवशी पू. भाऊकाकांकडे गेल्यावर संगणक चालू करत असतांना मी एका साधकेशी बोलत होते. त्या वेळी पू. काका तेथे आले आणि संगणकीय धारिका वाचण्यासाठी आसंदीत बसले. तेव्हा माझे लक्ष सहज घड्याळाकडे गेले. त्या वेळी घड्याळात दुपारचे बरोबर ३.३० वाजले होते. मी ज्या ज्या वेळी पू. भाऊकाकांकडे सेवेसाठी जायचे, त्या वेळी ते बरोबर दुपारी ३.३० वाजता सेवा चालू करायचे आणि संध्याकाळी ५ वाजता सेवा संपवायचे. (पू. भाऊकाका दुपारी ३.३० ते संध्याकाळी ५ या वेळेत संगणकीय सेवा करतात.) त्यानंतर ग्रंथ लवकर पूर्ण करायचा असल्याने ते संध्याकाळी ५ नंतरही लिखाणाची सेवा करायचे.
२. स्वयंशिस्त
अ. त्यांनी सांगितलेली सेवेतील एक सुधारणा मी वहीत लिहिली आणि पेनचे टोपण न लावता ते तसेच ठेवले. त्या वेळी ते मला म्हणाले, ‘‘पेनचे टोपण लावा !’’
आ. संगणकावर धारिका वाचतांना सुधारणा दाखवण्यासाठी त्यांच्याकडे मोरपिसाची एक काडी ठेवली आहे. ती काडी ठेवण्याची विशिष्ट जागा आहे. सेवा चालू केल्यावर ते स्वतः तेथील काडी घेतात आणि सेवा संपल्यावर स्वतः ती काडी जागेवर ठेवतात. त्यांचे वय ८६ वर्षे असूनसुद्धा ‘ते एखादी गोष्ट करायचे विसरले’, असे कधी झाले नाही.
३. विचारपूर्वक आणि अभ्यासपूर्वक लिखाण करणे
पू. भाऊकाका दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि ग्रंथ यांसाठी पुष्कळ विचारपूर्वक लिखाण करतात. त्यांच्या लिखाणातील एकही वाक्य अनावश्यक नसते. लिखाण त्यांनी स्वतःच्या मनाने किंवा उगीचच लिहिलेले नसते. ‘त्यांच्या अनुभवाचा इतरांना लाभ व्हावा. त्यांच्या अनुभवामुळे समोरच्याला साधनेची दिशा मिळावी’, हाच त्यांच्या लिखाणामागील शुद्ध हेतू असतो.
४. परिपूर्ण सेवा करण्याची तळमळ
अ. पू. भाऊकाकांच्या लिखाणातील संस्कृत अन्य कुणाला पडताळावे लागत नाही. एखाद्या संगणकीय धारिकेत असलेला गीतेमधील श्लोक वाचल्यावरच ‘तो कोणत्या अध्यायातील आणि कितवा श्लोक आहे ?’, हे ते सांगतात. एवढे असूनही ते त्यांच्याकडील श्रीमद्भगवद्गीता उघडून ‘त्यांनी सांगितलेले योग्य आहे ना ?’, याची निश्चिती करतात.
आ. ते प्रत्येक शब्द विचारपूर्वक लिहितात, तसेच साधकांनी विचारलेल्या शंकांचेही ते संदर्भग्रंथ किंवा शब्दकोश पाहूनच उत्तर देतात, उदा. एकदा ‘रुक्मिणी’ या शब्दातील ‘रु’ हे अक्षर र्हस्व लिहायचे कि दीर्घ ?’, याची निश्चिती करण्यासाठी त्यांनी स्वतः उठून शब्दकोश पाहिला. ३ शब्दकोश पाहिल्यावर त्यांना तो शब्द मिळाला.
इ. पू. भाऊकाकांचा एवढा अभ्यास असूनही त्यांना एखाद्या ठिकाणी शंका असेल, तर ते म्हणायचे, ‘‘तुमच्या व्याकरणतज्ञांना विचारा. त्यांचा अभ्यास आहे.’’
५. साधिकेकडून सेवेत चूक झाल्यावर तिला ‘पुढे चुका होऊ नयेत’, याची आपण काळजी घ्यायची’, असे सांगणे
पू. भाऊकाकांनी लिहिलेला एक लेख दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छापण्यापूर्वी त्यांनी मला त्या लेखात एक सुधारणा करायला सांगितली होती. ती माझ्याकडून करायची राहून गेली आणि तो लेख तसाच दैनिकात प्रसिद्ध झाला. तेव्हा पू. भाऊकाकांनी दैनिक कार्यालयात भ्रमणभाष करून त्या चुकीविषयी सांगितले. त्यांनी लिहिलेल्या पुढच्या लेखाच्या प्रतीवर मी ‘माझ्याकडून झालेल्या चुकीबद्दल मला क्षमा करा’, असे लिहून पाठवले. त्यावर ते त्यांच्या समवेत सेवा करत असलेल्या साधिकेला म्हणाले, ‘‘त्यांना सांगा, ‘क्षमायाचना नको. ‘पुढे चूक होऊ नये’, यासाठी प्रयत्न करायचा, एवढेच !’’ त्यानंतर मी त्यांना भ्रमणभाष करून त्यांची क्षमा मागितल्यावर ते म्हणाले, ‘‘आपण मनुष्य आहोत. मनुष्याकडूनच चुका होतात. त्या सुधारायच्या. केवळ देवच परिपूर्ण आहे.’’
५ अ. चूक सुधारण्यासाठी प्रयत्न केल्यावर साधिकेचे कौतुक करणे : पू. भाऊकाकांचे लेख रविवारच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध होत होते. त्यानंतर पुढच्या रविवारी त्यांचा लेख दैनिकात बिनचूक प्रसिद्ध झाल्यावर पू. काकांनी मला एका साधिकेकडून ‘अभिनंदन !’, असा निरोप पाठवला.
६. पू. भाऊकाकांच्या सहज बोलण्यातूनही उलगडलेले साधनेचे महत्त्व आणि त्यांची अहंशून्यता !
एकदा आमच्यात पुढील संभाषण झाले.
कु. रूपाली कुलकर्णी : पू. काका, तुम्ही माझा आधार आहात. मला या लिखाणातील काहीच कळत नाही.
पू. भाऊकाका : तुमच्या या बोलण्याने मला आठवण झाली, ‘तूची विश्वंभर विश्वाचा आधार !’ अहो, तेच विश्वंभर, श्रीकृष्ण, हेच जगाचा आणि सर्वांचा आधार आहेत.
कु. रूपाली कुलकर्णी : काका, चित्तशुद्धीचे (स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेचे) महत्त्व मला ठाऊक आहे; पण माझ्याकडून २ दिवस प्रयत्न होतात आणि नंतर २ दिवस होत नाहीत. असे नेहमीच होत असते.
पू. भाऊकाका : ही प्रक्रिया आयुष्यभर करावी लागते किंवा नेहमी सतर्क राहावे लागते. मी लिहिलेले लेख मी परत वाचले, तर मला पुन्हा काही चुका लक्षात येतील. आपण मनुष्य आहोत. मनुष्य परिपूर्ण नाही. प्रत्येकाला सतत प्रयत्न करावे लागतात.
मला पू. भाऊकाकांकडून पुष्कळ काही शिकायला मिळाले. ‘परिपूर्णता’ हा शब्द मी ऐकून होते; पण ‘प्रत्येक सेवा परिपूर्ण होण्यासाठीची धडपड म्हणजे नेमके काय असते ?’, हे पू. भाऊकाकांच्या सहवासात मला शिकायला मिळाले’, याबद्दल मी पू. भाऊकाका यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’
– कु. रूपाली कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.९.२०२१)
साधकांनो, श्रीकृष्णांसारखी संकटे तर आपल्या आयुष्यात नाहीत ना !एकदा पू. भाऊकाका मला म्हणाले, ‘‘राम-कृष्ण अवतार झाले. त्यांच्या आयुष्यात त्यांना पुष्कळ अडचणी आल्या. भगवान् श्रीकृष्ण लहान असतांनाच कंसाने त्यांना अनेक वेळा मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पूर्ण आयुष्यात त्यांना स्वजन आणि इतर यांच्याकडूनही पुष्कळ त्रास झाला. त्यांच्यावर स्यमंतक मणी चोरल्याचा आरोप झाला. जरासंधाने मथुरेवर १७ वेळा आक्रमणे केलीत. श्रीकृष्णांना मथुरा सोडून जावे लागले. आपण दूरदर्शनवरील मालिकांमध्ये पहातो, त्यामुळे आपल्याला वाटते की, महाभारत युद्ध झाले, तेव्हा श्रीकृष्ण तरुण होते. प्रत्यक्षात वयाच्या ८९ व्या वर्षी श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितली. सदैव येणार्या संकटांतही ते अविचल राहिले. ते शेवटपर्यंत स्वतः अंगीकारलेले दुर्जनांचा नाश आणि धर्मसंस्थापनेचे कार्य अविरत करत राहिले. श्रीकृष्णांपेक्षा आपले मनुष्याचे जीवन सुखी आहे. आपल्या आयुष्यात अशी संकटे नाहीत ना !’’ – कु. रूपाली कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.९.२०२१) |